भारीच! आमदार फंडातून ऑक्‍सिजन प्लांटची निर्मिती; शासनाकडून 90 लाखांचा निधी

जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर स्थितीत आहे. बाधितांचा आकडा दोन हजारांवर, तर मृत्यूचे प्रमाण दररोज 50 च्यावर गेले आहे.
Oxygen Plant
Oxygen Plant esakal

सातारा : कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढल्याने रुग्णसंख्याही प्रचंड वाढली आहे. परिणामी, वेळेत ऑक्‍सिजन बेड किंवा व्हेंटिलेटर न मिळाल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढले आहे. ऑक्‍सिजचा तुटवडा कायम असल्याने बेड वाढवणेही शक्‍य नाही. त्यावर उपाय म्हणून आमदार फंडातून (MLA Fund) ऑक्‍सिजननिर्मिती प्लांट (Oxygen Plant) व ऑक्‍सिजन साठविण्यासाठी लागणार टॅंक खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. 25 लाखांच्या खर्चाच्या मर्यादेत वाढ करून ती 90 लाख केली आहे. त्यामुळे प्रत्येक आमदार आपल्या फंडातून आपापल्या मतदारसंघातील शासकीय हॉस्पिटलसाठी किमान एक ऑक्‍सिजन प्लांट व साठवण टॅंक उभारू शकतील. (Oxygen Plant From MLA Fund At Satara)

जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर स्थितीत आहे. बाधितांचा आकडा दोन हजारांवर, तर मृत्यूचे प्रमाण दररोज 50 च्यावर गेले आहे. संसर्गाची टक्केवारी 40 टक्‍क्‍यांवरून कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन खासगी हॉस्पिटलच्या मदतीने प्रयत्न करीत आहे; पण संसर्ग कमी होत नसल्याने आरोग्य विभागावर ताण आला आहे. त्यातच नव्याने ऑक्‍सिजन बेडचे कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यास ऑक्‍सिजन टंचाईअभावी परवानगी दिली जात नाही. परिणामी, ऑक्‍सिजन बेडअभावी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनापुढे या परिस्थितीतच कोरोनाशी दोन हात करण्यावर भर दिला आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर शासनाने आता आमदार निधीतून कोरोनासाठी खर्च करण्याच्या मर्यादेवरील बंधन काढून घेतले आहे.

यापूर्वी आमदार फंडातून किमान 25 लाख रुपयेच खर्च करता येत होते. मात्र, आता ही मर्यादा शासनाने वाढविली आहे. त्यामुळे प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघात किमान एक ऑक्‍सिजन प्लांट उभारता येईल. त्यासाठी लागणारे 50 ते 90 लाख रुपये हे या फंडातून खर्च करता येतील. या निर्णयामुळे जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात ऑक्‍सिजन प्लांट उभारले जाऊ शकतात. त्यासाठी आमदारांनी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे. ऑक्‍सिजनअभावी जिल्हाधिकाऱ्यांकडे 58 विविध कोरोना हॉस्पिटलचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. आमदारांच्या फंडातून ऑक्‍सिजन प्लांट व साठविण्यासाठी टॅंक खरेदी केल्यास त्या- त्या मतदारसंघातील शासकीय हॉस्पिटल व कोरोना केअर सेंटरला लागणारा ऑक्‍सिजनचा पुरेसा पुरवठा होऊ शकेल. पर्यायाने ऑक्‍सिजन बेडची उपलब्धता झाल्याने अनेक गरजूंनाही दिलासा मिळेल.

आमदार निधीतून फक्त मेढ्यात प्लांट : आतापर्यंत मेडिकल ऑक्‍सिजन प्लांट उभारणीचे 17 प्रस्ताव आलेले होते. त्यापैकी 12 प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. यामध्ये 11 प्लांट हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या निधीतून उभारले जाणार आहेत, तर आमदार फंडातून आतापर्यंत केवळ मेढा येथील एक प्लांट उभारला गेला आहे. हा प्लांट आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून उभारला गेला आहे.

आता आमदारांच्या पुढाकाराची गरज : जिल्ह्यात विधानसभेचे आठ, विधान परिषदेचे दोन आमदार आहेत. त्यामुळे या सर्वांच्या प्रयत्नातून प्रत्येक मतदारसंघात एक ऑक्‍सिजन प्लांट व साठवणुकीसाठी टॅंक खरेदी करता येऊ शकणार आहे. जिल्ह्यातील ऑक्‍सिजनच्या तुटवड्याला आमदार पर्याय देऊ शकणार आहेत. तसे झाल्यास ऑक्‍सिजन बेडची संख्या वाढून ऑक्‍सिजन न मिळाल्याने कोरोना बाधितांच्या मृत्यू होणाऱ्याचे प्रमाण कमी होणार आहे. आता त्यासाठी आमदारांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

Reservation : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरंच 10 वर्षांसाठी आरक्षण हवे होते? जाणून घ्या 'सत्य'

Oxygen Plant From MLA Fund At Satara

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com