पाचगणी, महाबळेश्वरच्या बाजारपेठा ठप्पच, पर्यटकांची प्रतीक्षा

Satara
Satara

भिलार (जि. सातारा) : "कोरोना'या संसर्गित विषाणूमुळे आख्खं जनजीवन "ब्रेक' झाले असून, महाबळेश्वर या पर्यटनदृष्ट्या सधन असणाऱ्या तालुक्‍याचा पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. या व्यवसायावर अवलंबून असणारी हजारो कुटुंबे रोजगार आणि आर्थिक चलनवलनाच्या प्रतीक्षेत आहेत. पाचगणी व महाबळेश्वर या दोन्ही पर्यटनस्थळांवरील बाजारपेठा गेले चार महिने पूर्णपणे बंद होत्या. मात्र, आता सुरू असल्या तरी त्या भीतीच्या छायेखाली यंत्रवत झाल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. 

महाबळेश्वर तालुका हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. येथील पर्यटन व्यवसाय हा येथील लोकांचा जीव की प्राण आहे. तालुक्‍याचे 80 टक्के जीवनमान हे या पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. कोरोनामुळे हा पूर्ण व्यवसायच ठप्प झाल्याने येथील उलाढाल थांबल्याने अनेक कुटुंबे बेकार होण्याच्या मार्गावर आहेत. पाचगणी, महाबळेश्वर, भिलार, तापोळा, प्रतापगड, क्षेत्र महाबळेश्वर अशा ठिकाणी पर्यटक आले नाहीत तर बाजारपेठा संपूर्णपणे ओस पडतात. कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून या बाजारपेठा सुन्या सुन्या झाल्या आहेत. बाजारपेठेतील दुकाने उघडी ठेवूनही पर्यटकच नाहीत तर आर्थिक उलाढाल कशी होणार? असा प्रश्‍न व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. 

कंपन्यांत कामगार कपात 

तालुक्‍यात जॅम, जेली बनवणाऱ्या बऱ्याच कंपन्या सुरू आहेत. त्यांचा माल भारताबरोबरच परदेशातही जातो. मात्र, आता जगतिक बाजारपेठेत मागणीच नसल्याने कंपन्यांनी उत्पादने गोठवली आहेत. परिणामी आर्थिक उलाढाल थांबली आहे तर त्याचा फटका कामगारांना बसला आहे. या कंपन्यांतील कामगार बेकार झाले आहेत. अल्पशे कामगार घेऊन सध्या काम सुरू असले तरी बरेच कामगार सध्या घरीच आहेत. 

हातावर पोट असणारे बेकार 

सध्या पाचगणी, महाबळेश्वरमध्ये बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यावर असणारे परप्रांतीय कारागीर गेल्याने व कोरोनाच्या संकटाने चलनवलन ठप्प झाल्यामुळे कामेच बंद आहेत. त्यामुळे येथे काम करणारे कारागीर, मजूर बेकारीची खाईत लोटले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

शाळा, हॉटेल बंद 

पाचगणी येथे सुमारे 42 शाळा व 50 होस्टेल्स आहेत. महाबळेश्वर व पाचगणीत मिळून सुमारे छोटी- मोठी 500 च्या वर हॉटेल्स आहेत. संपूर्ण तालुक्‍यात 200 च्या वर ग्रामीण कृषी पर्यटन केंद्रे आहेत. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी विविध पार्क आहेत. पर्यटन व्यवसायच कोलमडल्याने हे सर्वच व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झालेली आहे. शाळा, हॉटेल, होस्टेल, पर्यटन केंद्र, मनोरंजनाचे पार्क बंद असल्याने येथील कामगार ही "बॅक टू होम' असल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना प्रतीक्षा आहे पर्यटकांची. 


""महाबळेश्वर तालुक्‍यात "कोरोना'च्या लॉकडाउनमुळे व्यावसायिकांची आर्थिक गणिते विस्कळित झालेली आहेत. पर्यटकांवर अवलंबून असलेले येथील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासनाला येथे विशेष आर्थिक पॅकेज द्यावे लागेल. याबाबत आम्ही शासनाकडे मागणी केली आहे.'' 
-डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्ष, हॉटेल व्यावसायिक, महाबळेश्वर 


""आमची बांधकामे लॉकडाउनमुळे पूर्णपणे बंद असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. कामगारांचे हाल झाले. आता बांधकामांना परवानगी दिली असली तरी साहित्याचा प्रश्न उद्‌भवतो. काही कामे पैशाच्या चणचणीने मालकांनी थांबवली आहेत. आम्हा व्यावसायिकांसह कामगारांना मोठा फटका बसला आहे.'' 
-सुधीर कासुर्डे, बांधकाम व्यावसायिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com