esakal | पाऊस पडतो झिरमिरी-झिरमिरी..; पारंपरिक 'भलरी'वर भात लागणीला वेग
sakal

बोलून बातमी शोधा

Rice Planting

कास, बामणोलीसह जावली, महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भागात घाटमाथा परिसर असून, सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे.

पाऊस पडतो झिरमिरी-झिरमिरी..; पारंपरिक 'भलरी'वर भात लागणीला वेग

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

कास (सातार) : पावसाचे आगार असलेल्या जावली, महाबळेश्वर तालुक्यात भात लावणीस (Rice Planting) वेगाने सुरुवात झाली असून शेतकरी डोक्यावर इरले, पोती, कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात (Heavy Rain) भाताची लावणी करण्यात व्यस्त आहेत. भाताच्या शिवारात ‘रामा हो रामा ..रामाच्या बागेमध्ये हो बागेमध्ये, पाऊस पडतो झिरमिरी-झिरमिरी.. माझ्या बंधूच्या शेतावरी, ध्यान मला रामाचं, ध्यान मला रामाचं.. मारुतीला रात्र झाली द्रोणागिरी जायाचं, वाईच्या डोंगरी गजबारल्या तोरणी..! अशा कित्येक पारंपरिक भलरी गीतांचे स्वर निनादत आहेत. (Paddy Planting Started In Jawali Mahabaleshwar Taluka bam92)

कास, बामणोलीसह जावली, महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भागात घाटमाथा परिसर असून, सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असते. डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. यामुळे जमिनीत कमी प्रमाणात पाणी मुरते. जमिनी लाल मातीच्या, मुरमाड असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भात, नाचणी, वरी पिके घेतात. या भागातील जमिनी कमी सुपिक, डोंगरउताराच्या तसेच लालमातीच्या असल्याने पिके चांगली येण्यास खूप मशागत करावी लागते. शेतकरी डिसेंबर, जानेवारी महिन्यात ऐन, जांभूळ, उंबर अशा झाडांची कवळे बांधतात. होळी सणानंतर तरव्यांची भाजणी केली जाते.

हेही वाचा: कोयनेत जोरदार पाऊस; धरणाच्या पातळीत अडीच 'TMC'ने वाढ

पावसाळ्याला सुरुवात होताच जून महिन्यात याच तरव्यांमध्ये भातांच्या बियाण्यांची पेरणी करून लावणीसाठी २१ ते ३० दिवसांपर्यंत रोपांची योग्य वाढ झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने औताच्या साह्याने भाताच्या वावरात चिखल करून त्यामध्ये तरव्यांतील भातांच्या रोपांची लावणी करण्यात येते. डोक्यावर इरलीचा आधार घेऊन पोती, कागदाची टापूस बांधून पावसात शेतकरी भातलावणी करत आहेत. भातलावणी करत असताना करमणुकीसाठी व कामाचा कंटाळा येऊ नये, यासाठी तालावर भलरी गीते म्हणत आहेत. भातलावणीसाठी अनेकांची आवश्यकता असल्याने एकमेकांना मदत करत आहेत. त्यामुळे भल्या पहाटे सुरू होणारा बळीराजाचा दिवस संध्याकाळी सातपर्यंत शेतातच मावळत आहे.

हेही वाचा: साताऱ्यासह महाबळेश्वरात धुवांधार; जिल्ह्यात 8.2 MM पावसाची नोंद

‘पैरा’ परस्परांना मदत करण्याची प्रथा

वस्तू अथवा पैशाचा कोणताही मोबदला न घेता भात लावणी करण्यासाठी अनेकजण एकमेकांच्या कामासाठी मदत करतात. यालाच परिसरात ‘पैरा’ म्हणतात. यामुळे कमी वेळात भातलावणी होण्यास मदत होते. सर्वांच्या भातलावण्या सुरू असल्याने औताला दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तर मेढा विभागातील सपाट भागात रोटावेटर व इतर चिखलणी करण्याच्या यंत्रांनी चिखलणी केली जात आहे.

Paddy Planting Started In Jawali Mahabaleshwar Taluka bam92

loading image