राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो; पाचगणीच्या विकासाची वाट मोकळी

रविकांत बेलोशे
Monday, 21 September 2020

या निवडणुकीतून कऱ्हाडकर यांनी आपला चाणाक्षपणा आणि बुद्धिमत्ता तसेच इतक्‍या वर्षांच्या राजकीय अभ्यासाची चुणूक दाखवली आहे. 
 

भिलार (जि. सातारा) : उपनगराध्यक्षपदाच्या निवडीच्या निमित्ताने ऐन कोरोनाच्या महाभयंकर काळातही थंड हवेच्या पाचगणीमधील वातावरण तप्त झाले होते. थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना अडचणीत आणण्याच्या आणाभाका घेणाऱ्या शक्तीचा बीमोड करत राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी दाखवून दिले.

पाचगणीच्या राजकारणात आपले स्थान बळकट केलेल्या कऱ्हाडकर यांनी प्रत्येकवेळी आलेल्या संधीचे सोन केले आहे, हा इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती पुन्हा यानिमित्ताने पाहायला मिळाली. राजकारण, प्रेम व युद्धात यात सारे काही माफ असते, याचा चोख अभ्यास असलेल्या नगराध्यक्षांनी शक्तिमान विरोधकांच्या कंपुतील चार मोहरे कच्च्या कडीच्या आधारावर गळाला लावण्यात यश मिळवले. त्यांना अनोखी सैर घडवीत आपलेसे केले आणि पुन्हा एकदा विनोद बिरामणे यांना उपनगराध्यक्षपद बहाल केले.

कास पठारवर फिरणे आले अंगलट; वन समितीने पर्यटकांकडून वसूल केला दंड सरसकट 
 
सुरुवातीला नगराध्यक्ष गटाकडे 14 आणि विरोधात चार नगरसेवक होते. त्यामुळे त्यांना कसलीच काळजी नव्हती. परंतु, त्यानंतर काही दिवसांत नगराध्यक्ष गटात धुसफूस सुरू झाली. असंतोषाची सीमा पार झाली आणि काहींनी कऱ्हाडकर यांच्याशी फारकत घेत आपली वेगळी चूल मांडली, पण राजकारणात माहिर असणाऱ्या कऱ्हाडकर यांनी विरोधातील चार नगरसेवकांना आपलेसे केले आणि बाजू सावरून घेतली. परंतु, काही बाह्य शक्तींनी सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांशी संगनमत करून समीकरणांची जुळवाजुळव करत पुन्हा एकदा कऱ्हाडकर यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. अगदी देवांच्या साक्षीने आणाभाका घेत वज्रमूठही घट्ट केली. पुन्हा एकदा नगराध्यक्षा पाच विरूद्ध 13 च्या गणितात अडकल्या. परंतु, थेट निवडून आल्याने त्यांनी कशाचीही तमा बाळगली नाही. तत्कालीन सत्ताधारी गटातील चार नगरसेवकांसह तब्बल 13 नगरसेवकांनी नगराध्यक्षा कऱ्हाडकर यांच्या विरोधात जुलै 2019 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला.

ढिंग टांग! : राजकारण करु नका!

त्यांनी गैरवर्तणूक केली असल्यामुळे त्यांना त्यांच्या पदावरून दूर करण्याची मागणी 13 नगरसेवकांनी केली. पुढे याचा निकाल अध्यक्षांच्या बाजूने लागला व विरोधकांची वज्रमूठ सैल होऊ लागली. पुढे विरोधी 13 जणांच्या मध्येही धुसफूस सुरू झाली. ही धुसफूस चव्हाट्यावर येऊ लागली. सत्तेत नसल्याने घुसमट होऊ लागल्याने सत्ताधारी, विरोधक आणि आणखी तटस्थ गट तयार झाला. यातूनच सर्वांना याची ओळख झाली. त्याचा प्रत्यय काही बैठकांत दिसून आला.

साता-याचं वातावरण एकदम कुल, चला शहर बनवूया कलरफुल!

आता विरोधाची ताकद फुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आले व त्याला निमित्त ठरले उपनगराध्यक्षपदाची निवडणूक. ऐन कोरोनात उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि वातावरण तापले. विरोधकांच्या धुसफुशीचा फायदा घेत नगराध्यक्षांनी रेखा कांबळे, अनिल वन्ने, विनोद बिरामणे व पृथ्वीराज कासुर्डे यांना पुन्हा आपल्या गोटात घेतले व पुन्हा एकदा राजकारण पालटवले. त्यामुळे आता नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष एकाच गटाचे झाल्याने विकासाला पुन्हा एकदा वाट मोकळी झाली आहे. या निवडणुकीतून कऱ्हाडकर यांनी आपला चाणाक्षपणा आणि बुद्धिमत्ता तसेच इतक्‍या वर्षांच्या राजकीय अभ्यासाची चुणूक दाखवली आहे. 

विराेधकांचे चार नगरसेवक फोडत नगराध्यक्षांनी पुन्हा उपाध्यक्षपद खेचून आणले

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panchgani Muncipal Council Vice President Election Laxmi Karadkar Satara News