esakal | आधी रक्तदान; मगच करणार लसीकरण! आगामी काळात रक्ताची कमतरता शक्‍य?

बोलून बातमी शोधा

Blood Donation
आधी रक्तदान; मगच करणार लसीकरण! आगामी काळात रक्ताची कमतरता शक्‍य?
sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : राज्यात 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणामुळे (Vaccination) रक्तदानावर मर्यादा येणार असल्याने जिल्ह्यात आगामी काळात रक्ताची कमतरता भासू शकते. जिल्ह्यातील नागरिकांना जीवनदान देणारी ही प्रक्रिया अविरत सुरू राहण्यासाठी लसीकरणापूर्वी रक्तदान (Blood Donation) ही खूणगाठ या वयोगटातील नागरिकांनी मनात पक्की बांधणे आवश्‍यक आहे. त्यासाठी नियमित रक्तदानात पुढाकार घेणाऱ्या संस्थांनीही सकारात्मक नियोजन करणे आवश्‍यक आहे. (Permission For Vaccination Of Citizens Between The Ages Of 18 To 44 By The Government)

शासनाने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील या वयोगटातील नागरिकांनीही शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणासाठी नोंदणी करण्यास सुरवात केली आहे. लशीच्या उपलब्ध साठ्यानुसार जिल्ह्यामध्ये या वयोगटाच्या लसीकरणासाठी पाच ठिकाणी लसीकरण केंद्रेही सुरू करण्यात आली आहेत. तेथे शासनाकडून मेसेज मिळालेल्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु, या वयोगटातील लसीकरणामुळे आगामी काळात जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्‍यता आहे. एका अभ्यासानुसार लसीकरण केल्यानंतर संबंधित व्यक्तीला प्रत्येक लसीकरणानंतर किमान महिनाभर रक्तदान करता येणार नाही. लसीकरणाच्या सध्याच्या पद्धतीनुसार प्रत्येक नागरिकाला दोन लस घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येक लसीकरणानंतर एक महिना म्हणजे दोन लसीकरणामुळे नागरिकांना दोन महिने रक्तदान करता येणार नाही. त्यामध्येही "कोव्हिशिल्ड'ची दुसरी लस घेण्यास सहा ते आठ आठवड्यांची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे रक्तदानाचा हा कालावधी अडीच महिन्यांपेक्षा जास्त वाढू शकतो.

बेड हवाय! एक फाेन फिरवा; युवक कॉंग्रेस येईल तुमच्या मदतीला

रक्तदात्यांचा आजवरचा वयोगट पाहिल्यास 18 ते 44 याच वयोगाटातील बहुतांश लोक हे सातत्याने रक्तदानात सहभागी होत असल्याचे समोर आले आहे. आगामी काळात हाच वयोगट लसीकरणात गुंतणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणारी संभाव्य रक्तटंचाई टाळण्यासाठी रक्तदानात नेहमी सहभागी होणाऱ्या संस्थांबरोबरच अन्य सामाजिक, राजकीय, धार्मिक संघटनांनी रक्तदानासाठी हिरीरीने पुढे येण्याची गरज आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये युवकांनी मोठी भूमिका घेणे आवश्‍यक आहे. आधी रक्तदान, मगच लस अशी भूमिका त्यांनी घेतल्यास रक्ताचा संभाव्य तुटवडा टाळता येणे शक्‍य आहे.

घाबरु नका; Home Isolation मधील 4913 रुग्ण बरे झाले

रक्तदात्याला प्राधान्य पाहिजे

रक्तदानाचा संभाव्य तुटवड्याचा कसा मुकाबला करायचा, यावर विचार सुरू आहे. त्यामध्ये रक्तदात्यांना लसीकरणामध्ये सवलत देण्याचा निर्णय झाल्यास रक्तदानाचे प्रमाण वाढू शकते, असा एक मुद्दा समोर येत आहे. परंतु, याबाबत जिल्हाधिकारी तसेच राज्य शासनाने निर्णय घेणे आवश्‍यक आहे. रक्तदान केल्याचे कार्ड दाखविणाऱ्याला लसीकरणात प्राधान्य देण्याचा निर्णय झाल्यास रक्तपुरवठा सुरळीत राहू शकतो.

लसीकरणापूर्वी करा रक्तदान

लसीकरण केल्यानंतर दोन महिने रक्तदान करता येत नाही. रक्तदान केल्यानंतर तीन महिने पुन्हा रक्तदान करता येत नाही. रक्तदान केल्यामुळे लसीकरणावर काही परिणाम होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लसीकरण करण्याआधी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे, विविध संस्था, संघटनांनीही सदस्यांशी चर्चा करून रक्तदान शिबिरांचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचे डॉ. ज्ञानेश्‍वर हिरास यांनी नमूद केले.

...इथे करू शकता रक्तदान

  • जिल्हा रुग्णालय रक्तपेढी, सातारा- 02162-238494

  • उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी, कऱ्हाड- 02164-222459

  • फलटण मेडिकल फाउंडेशन- 02166-221197

  • कृष्णा हॉस्पिटल, कऱ्हाड- 02164-241456

  • मायणी मेडिकल फाउंडेशन- 02161-270661

  • ए. एन. गुजर ब्लड बॅंक, कऱ्हाड- 02164-222868

  • बालाजी ब्लड बॅंक, सातारा- 02162-226995

  • अक्षय ब्लड बॅंक, सातारा- 02162-230730

  • यशवंतराव चव्हाण ब्लड बॅंक, कऱ्हाड- 02164-228122

Permission For Vaccination Of Citizens Between The Ages Of 18 To 44 By The Government