फलटणमध्ये ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा थरार; अठराचाकी कंटेनरची ट्रॅक्टर- ट्रॉली; कार, पिकअपला धडक

कोळकीकडून फलटण शहराकडे येणाऱ्या १८ चाकी कंटेनर चालकाने मद्यधुंद अवस्थेत कंटेनरने ट्रॅक्टर-ट्रॉली, कार, पिकअप गाड्यांना धडक देत क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याचे संरक्षण कठडे तोडले.
phaltan accident container crash with tractor car and pickup
phaltan accident container crash with tractor car and pickupSakal

फलटण शहर : कोळकीकडून फलटण शहराकडे येणाऱ्या १८ चाकी कंटेनर चालकाने मद्यधुंद अवस्थेत कंटेनरने ट्रॅक्टर-ट्रॉली, कार, पिकअप गाड्यांना धडक देत क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याचे संरक्षण कठडे तोडले. कंटेनर अगदी पुतळ्याजवळ जाऊन थांबल्याने अनेकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

शहरातील मध्यवर्ती क्रांतिसिंह नाना पाटील चौकात हा प्रकार घडल्याने आज दुपारी भर उन्हात अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. या घटनेत कारमधील एक जण जखमी झाला असून, गाड्या, शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. कंटेनर चालक देवीप्रसाद जगदेव यादव (वय ६२, रा. लवेदा, प्रतापगड, उत्तर प्रदेश) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अठरा चाकी कंटेनर (एमएच ४९- ११२०) आज दुपारी सुमारे एकच्या सुमारास कोळकीकडून फलटण शहराकडे येत होता. कंटेनरचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचे कंटेनरवरचे नियंत्रण सुटले होते.

कोळकी गावच्या हद्दीत अनंत मंगल कार्यालयासमोर एका विजेच्या खांबाला या कंटेनरने जोराची धडक दिली. यानंतर कंटेनरने कलिंगडाची विक्री करण्यास थांबलेल्या छोट्या ट्रॅक्टर व ट्रॉलीला, तसेच कारला धडक देत त्यांना फरफटत नेले.

ही धडक एवढी जोरात होती, की त्यात ट्रॅक्टरची चासी तुटली व पुढील दोन चाके वेगळी होऊन पडली. या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतील कलिंगडांचेही मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर त्यालगत मोबाईलसाठी लागत असलेल्या साहित्याची विक्री करत असलेल्या एका विक्रेत्याच्या कारलाही जोरदार धडक बसल्याने कारमधील मालाचे व कारचे मोठे नुकसान झाले.

या कारमधील एक जण जखमी झाला असून, त्यास तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयापासून सुरू झालेला हा ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’चा थरार पृथ्वी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील चौक असा धोकादायक पद्धतीने प्रवास करून थांबला; परंतु तत्पूर्वी कंटेनरने क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे प्रवासी असलेल्या एका पिकअपला जोरदार धडक दिली.

यामध्ये पिकअपचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. पिकअपमधील सर्व प्रवाशांचा थोडक्यात जीव बचावला. यानंतर कंटेनर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याभोवती असलेल्या संरक्षण कठड्याला जाऊन धडकला.

या धडकेत संरक्षण कठड्याचे मोठे नुकसान झाले असून, क्रांतिसिंहांचा पुतळ्याच्या चबुतरापासून अवघ्या फूटभर अंतरावर कंटेनर थांबल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर सुरुवातीला लोकांमध्ये घबराटीचे वातावरण होते; परंतु नेमकी परिस्थिती लक्षात आल्यानंतर अनेकांनी क्रांतिसिंहांच्या पुतळ्याकडे धाव घेत पुतळ्याची पाहणी केली.

संतप्त नागरिकांनी कंटेनर चालकाकडे धाव घेतली. त्या वेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी चालकाला चोप दिला. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत कुमार शहा,

पोलिस उपनिरीक्षक पारितोष दातीर व अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. कंटेनर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

काळ आला होता; पण...

कोळकी येथे कंटेनरने ट्रॅक्टर-ट्रॉलीला व कारला धडक देण्यापूर्वी विजेच्या खांबाला धडक दिली, यामध्ये विजेचा खांब वाकला. या धडकेमुळे कंटेनरचा वेग कमी झाला. कंटेनर थेट आला असता तर वडाच्या मोठ्या झाडाखाली सावलीसाठी थांबलेल्या प्रवासी, ग्राहकांसोबत मोठी दुर्घटना घडली असती.

धडकेनंतर कंटेनर न थांबवता चालकाने वर्दळीच्या पृथ्वी चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील चौक असा सुमारे तीन किलोमीटर नेहमी वर्दळ असणाऱ्या भागातून प्रवास केला; परंतु भर दुपारी तीव्र उन्हामुळे रस्त्यावर प्रवाशांची संख्या नेहमीच्या तुलनेत फार कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com