esakal | Phaltan | तालुक्यात जुगार क्लबवर पोलिसांचा छापा; 9 जण ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई

Phaltan : तालुक्यात जुगार क्लबवर पोलिसांचा छापा; 9 जण ताब्यात

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण : झडकबाईचीवाडी (ता.फलटण) येथे सागर ढाबा येथे सुरू असणाऱ्या तीनपानी पत्त्यांच्या जुगार क्लबवर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये पैशावर जुगार खेळणाऱ्या ढाबा मालकासह नऊ जणांना ताब्यात घेतले असून, ३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलिसांना सागर ढाबा येथे तीनपानी पत्त्यांचा जुगार खेळला जात असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून काल झडकबाईचीवाडी हद्दीतील फलटण-पुसेगाव रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सागर ढाब्याच्या इमारतीमध्ये सुरू असणाऱ्या तीनपानी पत्त्‍यांच्या जुगार क्लबवर छापा टाकला. या वेळी सतीश हनुमंत शिंदे, अप्पा लालासाहेब सालगुडे, शहाबुद्दीन यासिन आतार, सचिन संपत सोनवलकर, धनाजी शिवाजी जाधव, राकेश मच्छिंद्र नवले, केशव तात्याबा वाघ, तुळशीराम परशुराम घाडगे, तानाजी नारायण वाघ हे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता तीनपानी पत्त्यांचा जुगार, पैजेवर पैसे लावून खेळत असताना आढळले.

हेही वाचा: "अंथरुणाला खिळून आहे माझा ८ वर्षांचा मुलगा"; विकास पाटील भावूक

जुगार खेळण्यासाठी तानाजी नारायण वाघ (रा. ताथवडा, ता.फलटण, जि. सातारा) यांनी त्यांच्या आर्थिक फायद्याकरिता त्यांच्या मालकीच्या सागर ढाबा या हॉटेलची इमारत उपलब्ध करून दिली होती. त्या अनुषंगाने सागर ढाबाचे मालक तानाजी नारायण वाघ यांच्यासह ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाप्यामध्ये जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोटारसायकली व मोबाईल असा एकूण तीन लाख ८३ हजार ९ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अधिक तपास हवालदार एस. जी. शिंदे करीत आहेत.

loading image
go to top