
सामाजिक, वैचारिक, शैक्षाणिक क्षेत्रातील बदलांसाठी आयुष्य झिजवणाऱ्या डॉ. आ. ह. यांनी पहिल्यांदाच घेतलेल्या राजकीय भूमिकेचे पुणे पदवीधर मतदारसंघातील काय परिणाम होतात, याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा : राजकीय घटनाघडामोंडीपासून नेहमी दुर राहणाऱ्या ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी पुणे पदवीधर मतदार संघातील निवडणूकीबाबत ठोस भूमिका घेतली आहे. डॉ. आ. ह. यांनी या मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड यांना पाठींबा जाहीर केल्याने राज्यातील राजकीय तसेच वैचारिक क्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. पहिल्यांदाच राजकीय भूमिका जाहीर करणाऱ्या डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या या भूमिकेमुळे पुणे पदवीधर मतदार संघातील राजकीय गणिते बदलणार का याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.
परिवर्तनवादी आणि प्रस्थापित व्यवस्थेला हादरा देणाऱ्या डॉ. आ. ह. यांच्या विद्रोही आणि वैचारिक भूमिकेमुळे राज्याच्या पर्यायाने देशाच्या वैचारिक विचारविश्वात अनेकवेळा उलथापालथ झाली आहे. वैचारिक क्षेत्रात काम करताना डॉ. आ. ह. यांनी नेहमीच राजकीय क्षेत्र, त्यातील घटनाघडामोडींपासून जाणीवपुर्वक शेकडो हात लांब थांबणे पसंद केले होते. परंतु, पदविधर निवडणूकीमध्ये त्यांनी पहिल्यांदा राजकिय भूमिका घेतली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड यांना पाठींबा दर्शवित त्याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसारित केले. सामाजिक, वैचारिक, शैक्षणिक जीवनात कार्यरत असणाऱ्या डॉ. आ. ह. यांनी पहिल्यांदाच अशी भूमिका जाहीर केल्याने त्याची सर्वच क्षेत्रात चर्चा सुरु झाली आहे.
पदवीधर निवडणुकीत उदयनराजेंची भुमिका गुलदस्त्यात
निवेदनात डॉ. आ. ह. यांनी म्हटले आहे कि, माननीय क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड यांच्या विचारांवर चालणारे त्याचे सुपुत्र अरुण लाड हे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आहेत. हे पाहून मनस्वी आनंद वाटला. पुरोगामी विचारांचे वारसा जपणारे, ऋजु व विनम्र असे व्यक्तीमत्त्व पदवीधरांच्या हक्कासाठी न्याय देऊ शकेल, असा मला विश्वास वाटतो. सहकार, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध क्षेत्रांचा दीर्घकाळाचा अनुभव अरुण लाड यांच्या पाठीशी आहे. याचा फायदा पदवीधरांचे प्रश्न सोडविताना नक्कीच होवू शकेल. अरुण लाड यांच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदानही महत्त्वाचे आहे. ते गरीब मुलांसाठी वसतीगृत चालवतात अनेक विद्यार्थी त्याचा लाभ घेतात.
खेळ मनाचा... दुःखी की आनंदी जीवनाचा?
आदरणीय जी.डी. बापू लाड हे महान स्वातंत्र्य सैनिक होते. क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी स्वातंत्रचळवळीत काम केले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांचे सुपुत्र अरुण लाड हे बापू यांचा वारसा घेवून समाजकार्य करीत आहेत. त्यांना पदवीधर निवडणूकीसाठी माझा मनपुर्वक पाठींबा आहे. सामाजिक, वैचारिक, शैक्षाणिक क्षेत्रातील बदलांसाठी आयुष्य झिजवणाऱ्या डॉ. आ. ह. यांनी पहिल्यांदाच घेतलेल्या राजकीय भूमिकेचे पुणे पदवीधर मतदारसंघातील काय परिणाम होतात, याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Edited By : Siddharth Latkar