
माउली ग्रामविकास प्रतिष्ठानने आता नवीन पाऊल उचलत गावामध्ये फुलझाडांचे रोपण करण्याची मोहीम आखली. गाव तसेच शेरे स्टेशन व गावठाण भागातील सात गणेश मंडळांच्या मदतीने सदरच्या फुलझाडांची लागवड केली, तर प्रतिष्ठानने नुकतेच मुस्लिम मशिदीभोवती फळझाडांचे रोपण करत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश दिला आहे.
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : गावात येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा एक हजार 800 झाडांचे रोपण व नदीकाठावरील किनाऱ्यावर 400 झाडांच्या यशस्वी वृक्षारोपणानंतर शेरे येथील माउली ग्रामविकास प्रतिष्ठानने गावात फुलांचा सुगंध दरवळत ठेवण्यासाठी अनोखे पाऊल उचलले आहे.
प्रतिष्ठानकडून 300 फुलझाडांचे नुकतेच रोपण करण्यात आले आहे. गावातील गणेश मंडळांना रोपे उपलब्ध करून त्यांची जबाबदारी त्या मंडळांकडे देण्यात आली आहे. फुलझाडे फुलल्यानंतर गावचा परिसर बहरणार असल्याने या उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. गेली तीन वर्षे हे प्रतिष्ठान ग्रामविकासासाठी सर्वतोपरी कार्यरत आहे. प्रतिष्ठानने गावात येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा सुमारे 1800 झाडे लावून ती जगवलीदेखील आहेत. वृक्षारोपणासह अल्पावधीत अनेकविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम यशस्वी केले आहेत. त्याचबरोबर अनेक गरीब व गरजूंना मदतीचा हातदेखील दिलेला आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये आडके वस्तीवर वृध्द महिलेची झोपडी जळाली. त्यानंतर तत्काळ प्रतिष्ठानने मदतीसाठी आवाहन केल्यानंतर तब्बल 75 ते 80 हजार रुपयांची मदत गोळा झाली. त्यामधून जळालेले घर नव्याने उभारून आपले कार्य प्रतिष्ठानने अधोरेखित केले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पक्षी निरीक्षणाची संधी
याच कालावधीत वाया जाणाऱ्या वेळेचा सदुपयोग करत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दररोज सकाळी व सायंकाळी श्रमदानातून कृष्णा नदीकाठावरील बाभळी निर्मूलनाचे महत्त्वपूर्ण काम केले. यातून मोकळ्या झालेल्या तीन एकरांवर 400 दुर्मिळ फळझाडांचे रोपण केले आहे. सध्या गावात येणाऱ्या रस्त्यांच्या बाजूची 1800 झाडे व नदीकाठी लावलेली सर्व झाडे जगली आहेत. प्रतिष्ठानने आता नवीन पाऊल उचलत गावामध्ये फुलझाडांचे रोपण करण्याची मोहीम आखली. गाव तसेच शेरे स्टेशन व गावठाण भागातील सात गणेश मंडळांच्या मदतीने सदरच्या फुलझाडांची लागवड केली. सुवासिक व शोभेच्या फुलझाडे रोपण मोहिमेवेळी गावातील ग्रामस्थांसह महिला व युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. तर प्रतिष्ठानने नुकतेच मुस्लिम मशिदीभोवती फळझाडांचे रोपण करत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश दिला आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे