'मी पाचवडला जाऊन येतो', असे सांगून घरा बाहेर पडलेल्या मुलाचा झाला खून!

विलास साळूंखे
Saturday, 9 January 2021

अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची प्राथमिक माहितीही समोर येत आहे; परंतु पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेले नाही.

भुईंज (जि. सातारा) : भुईंज (ता. वाई) परिसरातील बेपत्ता युवकाचा खून करून मृतदेह स्मशानभूमीत जाळल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार युवकांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. आज (शनिवार) या प्रकरणाचा अधिकृत खुलासा पोलिस दलाकडून करण्यात येण्याची शक्‍यता आहे.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

भुईंजजवळच्या एका गावातील युवक सोमवारी (ता. 4) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास वडिलांना "मी पाचवडला जाऊन येतो,' असे सांगून बाहेर गेला होता. सायंकाळपर्यंत तो घरी आला नाही. त्यानंतर वडिलांनी त्याचे मित्र व नातेवाइकांकडे चौकशी केली; परंतु त्याच्याबाबत काही माहिती मिळाली नाही. शोधाशोध करूनही तो सापडला नाही. अखेर काल (ता. 7) सायंकाळी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी भुईंज पोलिस ठाण्यात नोंदविली.

जेवण करून शतपावलीसाठी गेलेल्या युवकांवर बिबट्याचा हल्ला; पाटणातील घटनेने नागरिकांत घबराट

चौकशीदरम्यान बेपत्ता युवकाचा खून झाला असावा, अशी माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर भुईंज पोलिसांबरोबरच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी या प्रकरणात लक्ष घातले. खबऱ्यांचे नेटवर्क ऍक्‍टिव्ह केले. त्यामध्ये चार मित्रांनी अपहरण करून संबंधित युवकाचा खून केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

महापुरुषाच्या नावाचा फलक फाडल्याप्रकरणी उदयनराजे समर्थक आक्रमक

संबंधित युवकांनी बेपत्ता युवकाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे घरापासून हाकेच्या अंतरावरच त्या युवकाला जाळण्यात आल्याचे, तसेच त्याच्या सावडण्याचा विधीही उरकल्याचे समोर येत आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची प्राथमिक माहितीही समोर येत आहे; परंतु पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेले नाही. आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पोलिस दलाकडून उद्या याबाबतचा अधिकृत खुलासा केला जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिसांकडून सांगण्यात आले.

आई - बाप झालो म्हणून गगनात मावत नव्हता आनंद..पण रात्री क्षणार्धात होत्याच झालं नव्हतं

सीसीटीव्ही फुटेज्‌वरून प्रकार उघड

संशयित युवकांनी सरपणाची (लाकूड) शोधाशोध सुरू केली. मात्र, त्यांना भुईंजमध्ये सरपण न मिळाल्याने चिंधवली, पाचवड या ठिकाणी त्यांनी शोधाशोध केली. त्या वेळी एका वखारीत चार युवक रात्रीच्या वेळी जळण भरत असल्याचे तेथील सीसीटीव्ही फुटेज्‌मध्ये दिसून आले. त्यावरून पोलिसांनी संबंधित टेंपो व युवकांना ताब्यात घेतले.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Arrested Four Near Bhuinj Satara Marathi News Crime News