बारा वर्षांच्या मुलाचा खून; सातारा पोलिसांनी एकास घेतले ताब्यात

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 7 January 2021

संशयित म्हणून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असता त्याने खून केला असल्याची कबुली दिली. यानंतर त्या मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. या घटनेनंतर म्हसवे परिसरात खळबळ उडाली आहे.

सातारा : सातारा तालुक्‍यातील म्हसवे येथे लमाण वस्तीत राहणाऱ्या बारा वर्षीय मुलाचा उसाच्या शेतात दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना मंगळवारी लमाण वस्तीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या संब्याचा माळ, पिराचा माळ परिसरात घडली. बुधवारी रात्री या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. गंगाराम रमेश राठोड असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

खुनाची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे, तसेच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. शिवीगाळ झाल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

बसण्यापूर्वीच करा वयाचा विचार, अन्यथा खावी लागणार तुरुंगाची हवा; जाणून घ्या हे महत्वाचे नियम

गंगाराम या बारा वर्षीय मुलाला मंगळवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेत राहत्या घरासमोरून कोणीतरी पळवून नेल्याची फिर्याद त्याची आई ललिता रमेश राठोड (रा. म्हसवे, लमाणवस्ती, ता. जि. सातारा) यांनी दिली होती. याप्रकरणी रात्री उशिरा पावणेबारा वाजण्याच्या सुमारास अनोळखी विरोधात गुन्हा दाखल झाला होता. बुधवारी या घटनेचा तपास करण्यासाठी तालुका पोलिस श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून तपास सुरू केला होता. या वेळी पोलिस दलाच्या श्वानपथकाला गंगारामच्या पायमोजेचा वास दिल्यानंतर श्वान जवळच्या परिसरातच घुटमळू लागले. त्याला पुन्हा वास दिल्यानंतर ते श्वान संब्याचा माळ, पिराचा माळ परिसरात असणाऱ्या एका उसाच्या शेतात जाऊन थांबले. येथे पोलिसांनी पाहणी केली असता गंगारामचा मृतदेह आढळून आला.

साताऱ्याच्या बहादराची उद्योगात मुकेश अंबानींशी स्पर्धा; ‘दुकान’अ‍ॅप पुढे जिओ मार्ट हतबल

बाजूलाच आठ ते दहा दगड पडलेले दिसून आले. या घटनेनंतर पोलिसही अवाक झाले होते. त्यांनी परिसराचा पंचनामा करून वेगाने तपास सुरू केला.
यानंतर पोलिसांनी गंगाराम अथवा त्याच्या कुटुंबाचा कोणाशी वाद झाला होता का, याची माहिती घेण्यास सुरुवात केली. या वेळी त्याच परिसरात एका 16 वर्षीय मुलाचा आणि गंगारामचा किरकोळ कारणावरून वाद झाला असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे संशयित म्हणून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असता त्याने खून केला असल्याची कबुली दिली. यानंतर त्या मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. या घटनेनंतर म्हसवे परिसरात खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Investigating Death Of Twelve Year Child Satara Crime News