esakal | राष्ट्रवादी पराभवाचा वचपा काढणार? दादांमुळे कार्यकर्ते 'चार्ज' I Ajit Pawar
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

खटाव-कोरेगाव आणि माण-खटाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

राष्ट्रवादी पराभवाचा वचपा काढणार? दादांमुळे कार्यकर्ते 'चार्ज'

sakal_logo
By
ऋषिकेश पवार

विसापूर (सातारा) : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दहा दिवसांच्या कालावधीत दोनदा खटाव तालुक्याच्या (Khatav Taluka) दौरा केला. निमित्त होते विकासकामांचे उद्‍घाटन व भूमिपूजन. त्याला जोडूनच रविवारी सायंकाळी खटाव येथे झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात दादांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच ‘चार्ज’ झालेले पाहावयास मिळत आहेत. दादांच्या या दौऱ्याचा फायदा आगामी जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये (Panchayat Samiti election) होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

हेही वाचा: शिवसेनेला कमी लेखण्याची चूक करु नका : उदय सामंत

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील खटाव- कोरेगाव आणि माण- खटाव विधानसभा मतदारसंघात पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे पवार कुटुंबीयांच्या अगदी जवळचे समजले जाणारे शशिकांत शिंदे आणि प्रभाकर देशमुख यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी, तसेच दोन्ही मतदारसंघांत बॅकफूटवर गेलेल्या पक्षाचे नुकसान भरून काढण्यासाठी दादांनी स्वतः लक्ष घातलेले या दौऱ्यावरून दिसून येत आहे. खटाव येथील जाहीर सभेला लोकांनी लावलेली उपस्थिती, या वेळी पक्षात मोठ्या संख्येने झालेले जाहीर प्रवेश यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकांसाठी शड्डू ठोकला आहे, असे म्हणण्यास वाव आहे. विशेषतः दादांच्या या दौऱ्यामुळे खटाव आणि पुसेगाव जिल्हा परिषद गटात प्रदीप विधातेंना चांगलाच फायदा होणार आहे. त्यासोबतच विधानसभेच्या पराभवाचे शल्य बाजूला सारून जुन्या चुका सुधारून पक्षाला बळकटी देण्याचे काम होणार आहे.

हेही वाचा: 'निवडणुकीत तिकीट फिक्स समजू नका; आता पॅरामीटर लावूनच तिकीट'

दरम्यान, पक्षाची ताकद वाढावी व कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी, यासाठी जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा वीज वितरण समिती निवडीत दोन्ही मतदार संघांना झुकते माप दिल्याचे चित्र आहे. यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून, दोन्ही मतदार संघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे, तसेच पक्षाची संघटना मजबूत करताना नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार असल्याचा इशारा दादांनी खटावच्या जाहीर सभेत दिल्यामुळे आगामी निवडणुकांसाठी तरुण वर्गाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे.

हेही वाचा: 'मुलांना शाळेत पाठवायचं, की नाही हा सर्वस्वी निर्णय पालकांचा'

कार्यकर्त्यांनी मनावर घेतले तर...

कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या पुसेगाव आणि खटाव या दोन जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये शिवसेनेचे आमदार महेश शिंदे प्रतिनिधित्व करतात तर उर्वरित भागात भाजपचे आमदार जयकुमार गोरे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्ह्याला राष्ट्रवादीचा गड आहे असे म्हणताना लोकांना शंका येत आहे; परंतु आता अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी मनावर घेतले तर राष्ट्रवादीचा गड पुन्हा काबीज होईल, अशी कुजबूज कानी येत आहे.

loading image
go to top