esakal | राष्ट्रवादीसह भाजपचा बॅंका, पतसंस्थांवर 'डोळा'; पालकमंत्री पाटील, शिवेंद्रसिंहराजेंत 'चुरस'
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Bank Election

निवडणुकीत नागरी बॅंका, पतसंस्था मतदारसंघात यावेळेस चुरशीची लढत होणार आहे.

राष्ट्रवादीसह भाजपचा बॅंका, पतसंस्थांवर 'डोळा'

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) नागरी बॅंका, पतसंस्था मतदारसंघात यावेळेस चुरशीची लढत होणार आहे. या मतदारसंघाची निवडणूक कधीच बिनविरोध झालेली नाही. यामध्ये सर्वाधिक काळ विलासराव पाटील- वाठारकर हेच संचालक राहिले होते. यावेळेस या मतदारसंघातून इच्छुकांची संख्या अधिक असून, कऱ्हाडमधील उमेदवारासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil), तर साताऱ्यातील उमेदवारासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinhraje Bhosale) या मतदारसंघांसाठी आग्रही आहेत. सर्वाधिक मते सातारा व कऱ्हाड तालुक्यांत असल्याने या दोन तालुक्यांतीलच उमेदवाराचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत बॅंका, पतसंस्था मतदारसंघावर सर्वांची नजर आहे. आजपर्यंत या मतदारसंघाची निवडणूक कधीच बिनविरोध झालेली नाही. त्यामुळे चुरशीची लढत देतच या मतदारसंघातून संचालक बॅंकेवर जातात. आजपर्यंत दिग्गज नेते या मतदारसंघातून संचालक झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक काळ म्हणजे तीन पंचवार्षिक विलासराव पाटील-वाठारकर हेच संचालक म्हणून निवडून आले होते. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव राजेश पाटील-वाठारकर यांना संचालक म्हणून संधी दिली. आता यावेळेसह या मतदारसंघावर तिघांचा डोळा आहे. यामध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना हा मतदारसंघ कऱ्हाडातील उमेदवारासाठी हवा आहे. तर आजपर्यंत राखीव मतदारसंघ वाटणीला येत असल्यामुळे आता यावेळेस बॅंका, पतसंस्था हा मतदारसंघ साताऱ्याला द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजेंची आहे. तर कऱ्हाड सोसायटी मतदारसंघाचे गणित जुळविण्यासाठी भाजपचे नेते अतुल भोसले हेसुध्दा या मतदारसंघाची मागणी करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: जुलमी मोदी सरकार खोटी स्वप्नं दाखवून सत्तेत; नाना पटोलेंचा घणाघात

या मतदारसंघात ३७४ मते असून, सर्वाधिक मते सातारा तालुक्यात तर त्यापाठोपाठ कऱ्हाड तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाची मते आहेत. कऱ्हाडातून उदयसिंह पाटील-उंडाळकर, राजेश पाटील-वाठारकर, अतुल भोसले यांची नावे आघाडीवर आहेत. तर कोरेगावातून मनोहर बर्गे, साताऱ्यातून प्रभाकर साबळे, विनोद कुलकर्णी आणि खटाव तालुक्यातून सुरेंद्र गुदगे हे इच्छुकांच्या यादीत आहेत. या सर्वांनी आपापले ठरावही केलेले आहेत. त्यामुळे साताऱ्याच्या वाटणीला हा मतदारसंघ आल्यास प्रभाकर साबळे किंवा विनोद कुलकर्णी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आजपर्यंत कऱ्हाड तालुक्यातीलच उमेदवार या मतदारसंघावर राहिलेला आहे. त्यामुळे कऱ्हाड व सातारा सोडून इतर कोणत्या तालुक्यातील उमेदवाराला संधी दिली जाणार काय, याबाबतचीच उत्सुकता आहे.

हेही वाचा: योगींच्या राज्यात भाजपच्या माजी मंत्र्याची टॉवेलने गळा आवळून हत्या

आजपर्यंतचे संचालक...

लक्ष्मीनारायण जाजू, मदनराव जाधव, शंकर आप्पा संसुद्दी, मदनराव मोहिते, विलासराव पाटील-वाठारकर, राजेश पाटील-वाठारकर.

loading image
go to top