बारामतीकरांची सुपारी उचलून जिहे-कठापूर अडचणीत आणत असाल तर..; सेना आमदाराचा NCP आमदाराला इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Shinde

'बारामती आणि सांगलीकरांच्या दलालांनी वसना-वांगना योजना चुकीची डिझाईन केली.'

'बारामतीकरांची सुपारी उचलून जिहे-कठापूर अडचणीत आणत असाल तर..'

विसापूर (सातारा) : महेश शिंदेसाठी पाणीप्रश्न हा कधीच राजकीय नव्हता आणि भविष्यातही नसणार आहे. आमचा पाणीप्रश्न दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारा आणि येथील युवकांचा भवितव्य ठरविणारा आहे. याचीच जाणीव असल्याने जिहे-कठापूरची योजना (Jihe-Kathapur Scheme) पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र झटलो आणि त्यात यशस्वीही झालो, असे आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांनी नमूद केले.

निढळ (ता. खटाव) येथील विविध विकासकामांच्या उद्‌घाटन व प्रारंभप्रसंगी जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी उद्योजक गजानन खुस्पे, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त माजी उपसरपंच रणधीर जाधव, युवा नेते राहुल पाटील, सरपंच बायडाबाई ठोंबरे, उपसरपंच श्रीकांत खुस्पे, संजय भोंडवे, सचिन खुस्पे, ताया खुस्पे, साहेबराव पाटील, भीमराव पाटील, विजय शिंदे, चंद्रकांत खुस्पे, राजेंद्र घाडगे, बापूराव खुस्पे उपस्थित होते. जिहे-कठापूर योजनेसाठी आवश्यक केंद्रीय जल आयोगाची मान्यता आणि एक हजार १५ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने योजनेचे रखडलेले प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागले. मागचे लोकप्रतिनिधी जलसंपदामंत्री असताना त्यांना स्वतःच्याच खात्याची सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यायला जमली नव्हती, अशी टीकाही त्यांनी आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांचा नामोल्लेख टाळत केली.

हेही वाचा: Election 2021 : राष्ट्रवादीच्या उमेदवारांपुढं तगडं आव्हान

ते म्हणाले, ‘‘बारामती आणि सांगलीकरांच्या दलालांनी वसना-वांगना योजना चुकीची डिझाईन केली. परिणामी, प्रचंड लाइट बिल आणि अत्यल्प पाणी अशा दुर्दैवी स्थितीत ही योजना अडकून या भागाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नेर तलावातून निढळ भागात, तसेच दरजाई तलावात पाणी आणताना हा धोका लक्षात घेणे गरजेचे आहे. बारामतीकरांची सुपारी उचलून कुणी वसना-वांगनाप्रमाणे जिहे-कठापूरची योजना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल, तर महेश शिंदे हे होऊ देणार नाही.’’ संजय भोंडवे, नंदकुमार देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमात कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. शंकरराव खुस्पे यांनी प्रास्ताविक केले. अमित भिसे यांनी सूत्रसंचालन केले, तर तानाजी ठोंबरे यांनी आभार मानले.

हेही वाचा: 'दलितांच्या 10 वेळा घरी जा.. तिथं चहा प्या, जेवण करा आणि मगच मत मागा'

loading image
go to top