esakal | मठावरील 'ते' किस्से आम्हाला जनतेपुढे सांगावे लागतील; NCP नेत्याचा सेनेच्या आमदाराला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Shashikant Shinde

दारूवाला कोण आहे, विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान कोणाच्या गाडीत दारूच्या बाटल्या असायच्या, याचा मी साक्षीदार आहे.

मठावरील 'ते' किस्से आम्हाला जनतेपुढे सांगावे लागतील

sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव (सातारा) : आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांच्यापासून दुरावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) कार्यकर्त्यांची घरवापसी सुरू झाल्याने विद्यमान लोकप्रतिनिधींची दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच झोप उडाली असावी आणि त्यातूनच दिवसा नकारात्मक स्वप्ने पाहात ते शशिकांत शिंदे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करू लागले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप तीन वर्षे आहेत. त्या वेळी कोण कोणाचे डिपॉझिट जप्त करणार हे, स्पष्ट होणारच आहे. नशिबाने मिळालेली आमदारकी लोककल्याणासाठी वापरावी, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस रमेश उबाळे (Ramesh Ubale) यांनी आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांचे नाव न घेता त्यांना दिले आहे.

यासंदर्भातील पत्रकात श्री. उबाळे यांनी म्हटले आहे, की गेल्या आठवड्यामध्ये पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पक्षापासून बाजूला गेलेल्या काही कार्यकर्त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात पुनर्प्रवेश केला. त्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधींची झोप उडाली असावी आणि नैराश्यातून ते बेताल वक्तव्य करू लागले आहेत. कोविड सेंटर काढल्याचे ते म्हणतात, तर समाजसेवक असल्याचे भासवत लोकांच्या डोळ्यांमध्ये धूळफेक करून कोविड सेंटरच्या नावावर सर्वसामान्यांकडून गोळा केलेल्या वर्गण्या, बिले, साहित्याचाही हिशेब जनतेला द्यावा. कोविड सेंटरच्या आडून व्यवसाय करून मेडिकलवाल्यांकडून किती पैसे घेतले, हे जाहीर करावे आणि यापुढे कोविड सेंटरची टिमकी वाजवणे बंद करावे. पंढरपूरच्या हॉस्पिटलमध्ये किती भागीदारी आहे. तेथे किती रुग्ण पाठवले आणि त्यांच्याकडून किती पैसे गोळा केले, हेही जाहीर करावे.

हेही वाचा: 'माझ्या नादाला लागू नका, नाहीतर पुढच्या वेळी डिपॉझिट पण ठेवणार नाही'

मठावरील तुमचे पुराव्यानिशीचे किस्से आम्हाला जनतेपुढे सांगावे लागतील. शशिकांत शिंदे यांनी पराभव मान्य केला आहे. पराभवामुळे ते संपले नाहीत, तर नव्या जोमाने ते पुन्हा काम करत आहेत. जातिवंत शेतकरी राष्ट्रवादीत आहेत, की भाजपमध्ये, हे जनतेला ठाऊक आहे. भाजपमधून उमेदवारी मिळाली नाही, म्हणून शिवसेनेने तुम्हाला उमेदवारी दिली आणि तुम्ही निवडून आला, हे आम्हाला मान्य आहे. दारूवाला कोण आहे, विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान कोणाच्या गाडीत दारूच्या बाटल्या असायच्या, याचा मी साक्षीदार आहे. आम्ही विज्ञानवादी लोक आहोत. गंडे, दोरे, जादू, टोण्याला आमच्याकडे महत्त्व नाही. मंतरलेल्या पाण्यामुळे कोरोना बरा होतो, असे सांगत गेल्या वर्षी कोरेगाव मतदारसंघात हे पाणी कोण वाटत होते. अशा भामटेगिरी, भोंदूगिरीला ओळखून असलेले लोक विधानसभेच्या आगामी निवडणुकीत नक्कीच जागा दाखवून देतील, असेही श्री. उबाळे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

हेही वाचा: टेंडरसाठी राष्ट्रवादीत आलेल्यांना परळीत थारा नाही

loading image
go to top