ग्रामपंचायतीला केंद्राकडून मोठा निधी, मात्र रस्त्याची सोय करता येईना साधी!

ग्रामपंचायतीला केंद्राकडून मोठा निधी, मात्र रस्त्याची सोय करता येईना साधी!

कोळकी (जि. सातारा) : येथील ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेक खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघातही होत आहेत. रस्ता खड्ड्यामध्ये आहे की, खड्डा रस्त्यामध्ये आहे? हा एक संशोधनाचा विषय झाला आहे. 

फलटण-शिंगणापूर मुख्य रस्त्यापासून ते राऊत वस्ती शाळेपर्यंत रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे पडलेले आहेत. सध्या पावसाळा असल्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून खड्डे मोठे होत आहेत. चोरमले सरांचे घर ते वनदेव शेरीमधील शिंदे वस्तीपर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडला गेलेला आहे. याच रस्त्यावर ग्रामपंचायत इमारत उभी आहे. सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी याच मार्गाने खड्ड्यामधून मार्ग काढत ग्रामपंचायतीमध्ये येतात. तालुक्‍यातील आर्थिकदृष्ट्या ही ग्रामपंचायत श्रीमंत असूनही रस्ता दुरुस्ती करण्याबाबत मार्ग निघत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.

दरवर्षी ग्रामपंचायतीला केंद्र सरकारकडून मोठा निधी येत आहे. शिवाय घरपट्टीमधूनही मोठा महसूल ग्रामपंचायतीला मिळत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी पैशाचा प्रश्‍न नसून राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. ग्रामपंचायतीशेजारीच जिल्हा परिषदेची शाळा आहे. वाहनांची वर्दळही जास्त असते. एकंदरीतच या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. त्यामुळे राजकीय वरिष्ठांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देवून फलटण-शिंगणापूर मुख्य रस्ता ते वनदेवशेरी येथील शिंदे वस्तीपर्यंतचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com