‘अस्वस्थपर्व’ श्रीराम पवार यांच्या पुस्तकाचे साताऱ्यात प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shriram Pawar
‘अस्वस्थपर्व’ श्रीराम पवार यांच्या पुस्तकाचे साताऱ्यात प्रकाशन

‘अस्वस्थपर्व’ श्रीराम पवार यांच्या पुस्तकाचे साताऱ्यात प्रकाशन

सातारा - आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सोप्या भाषेत परखड भाष्य करणारे श्रीराम पवार (Shriram Pawar) यांचे ‘अस्वस्थपर्व’ हे पुस्तक (Aswasthaparva Book) सर्वसामान्य नागरिकांमध्येही आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत (International Movement) कुतूहल निर्माण करेल. या पुस्तकात भारतासमोरील आव्हाने, परराष्ट्र धोरण व जागतिक घडामोडींचे वर्णन त्यांनी अतिशय साध्या व सोप्या भाषेत मांडले आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आज येथे व्यक्त केले.

सकाळ माध्यम समूहाचे संपादक, संचालक व राजकीय विश्लेषक श्रीराम पवार यांनी लिहिलेल्या ‘अस्वस्थपर्व-वेध जागतिक घडामोडींचा’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या उपस्थितीत आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्या वेळी ते बोलत होते. हे पुस्तक ‘सकाळ प्रकाशना’ने प्रसिद्ध केले आहे. श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘कोरोनामुळे अर्थव्यवस्थेची घडी बसविण्याचे देशापुढे मोठे आव्हान आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडत असून, त्या देशात तालिबानी घुसल्यास त्याचा दुष्परिणाम आपल्या देशावर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेशी राष्ट्राध्यक्षांशी कथित दोस्ती करून संबंध सुधारण्याचा प्रयत्न फसला आहे. रोजगार टिकवणे, अर्थव्यवस्थेची घडी बसवणे, तसेच चीनशी ताणलेले संबंध असे सर्व अस्वस्थ करणारे हे वातावरण आहे. चीनबाबत मोदींचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरले आहे. यापूर्वी नेहरूंचे धोरण अपयशी ठरविले जात होते. आता मोदींचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरले आहे. एकूणच अर्थव्यवस्थेवरील मोदी सरकारचे नियंत्रण सुटत चालले आहे.’’

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी सध्याच्या जागतिक घडामोडींचा संदर्भ देत स्वामी विवेकानंदांचे विचार जगाने स्वीकारण्याची गरज असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, ‘‘सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडी गांभीर्याने विचार करायला लावणाऱ्या आहेत. त्याची नेमकी मांडणी श्री. पवार यांनी आपल्या पुस्तकात केली आहे. खरे तर स्वामी विवेकानंदांनी त्या काळात अमेरिकेत जाऊन मांडलेले विचार किती महत्त्वपूर्ण होते, हे आजच्या काळातील जागतिक परिस्थितीवरून लक्षात येते. या नजरेतून हे पुस्तक वाचायला हवे.’’ भारताच्या दृष्टीने परराष्ट्र धोरण व इतर जागतिक घडामोडींची परिपूर्ण मांडणी अस्वस्थपर्व या पुस्तकात आढळते, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: दुर्लक्षित माणचा समृद्ध प्राचीन इतिहास उजेडात; पाहा व्हिडिओ

श्रीराम पवार म्हणाले, ‘‘या पुस्तकात एक अत्यंत महत्त्वाचा काळातील जागतिक घडामोडींचा वेध घेतला आहे. एका बाजूला प्रचंड कुतूहल वाटत असताना दुसरीकडे आपली सवयीची घडी विस्कटताना दिसते आहे. अनेक नवी आव्हाने उभी राहात आहेत, असा अस्वस्थतेचाही हा काळ आहे. जगाच्या व्यवहारात एकच व्यवस्था कायम राहात नाही. काही अभ्यासक त्याकडे ग्रेट गेमच्या नजरेतून पाहतात. जो त्या त्या काळातील मोठ्या सत्तांमध्ये चालत आला आहे आणि त्या सत्तांचे निर्णय, धोरणे याचा परिणाम जगाला भोगावा लागतो. कधी हा संघर्ष युरोपियन सत्तांमध्येच होता कधी ब्रिटन आणि रशियाच्या साम्राज्यात होता, तर दुसऱ्या महायुद्धानंतर तो स्पष्टपणे अमेरिका आणि सोव्हिएत संघात वाटलेल्या जगात साकारला. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिका ही एकच महासत्ता उरली तिला आव्हान देणारा सोव्हिएत संघ कोलमडला. त्यातून अनेक नवी राष्ट्रं साकारली. पूर्व युरोप आणि पश्‍चिम युरोपातील कृत्रिम फाळणी संपुष्टात आली. जर्मनीचं एकत्रीकरण झालं. या घडामोडी नव्या युगाची द्वाही फिरणाऱ्या होत्या. ते युग अमेरिकेच्या वर्चस्वाचं होतं. जगाच्या व्यवहारात अमेरिकेला आणि म्हणून अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना रोखणारं कोणी नाही असा हा काळ होता. मात्र, जागतिकीकरणाचा बोलबाला याच काळात सुरू झाला. तो पाश्चात्त्य भांडवलदारांच्या निदान तेव्हा तरी हिताचा होता. जागतिकीकरणाच्या तीस वर्षांच्या वाटाचलीनंतर आता मात्र त्यातील अनेक गृहितकांना टाचणी लावणारं वळण जागतिक व्यवहारात आलं आहे, या पुस्तकात याच कालखंडातील जागतिक घडामोडींचा आढावा घेतला आहे. त्याविषयी काही भूमिका घेतली आहे.’’

ते म्हणाले, ‘‘सध्या भूमी आधारित राष्ट्रवाद बळकट होताना दिसतो आहे. जीडीपी आधारावरील प्रगती अखंडपणे चालत राहील याचाही फेरविचार करायची वेळ आणली आहे. या प्रकारच्या मुक्त अर्थरचनेच्या मॉडेलमधून येणारी सुबत्ता झिरपत खाली जाईल आणि सर्वांनाच त्याचा लाभ मिळेल या गृहितकातील फोलपणाही समोर येतो आहे. तीस वर्षांत संपत्ती निर्मितीचं प्रमाण प्रचंड वाढेल मात्र, संपत्ती मूठभरांच्या हाती एकवटण्याचं प्रमाणही अधिक गतीने वाढले आहे. जग अधिक लोकशाहीवादी, अधिक उदारमतवादी होईल असं वाटत असताना जगभरात उजवीकडं झुकलेल्या नेत्यांची सरशी होताना दिसायला लागली. अशा अनेक घडामोडींतून जग अस्वस्थतेच्या वळणावर आले आहे. मागच्या चार-पाच वर्षांतील या जागतिक घडामोडीत, राजकारणात या साऱ्याचं प्रतिबिंब दिसेल.’’

हेही वाचा: सातारा : दुर्लक्षित माणचा समृद्ध प्राचीन इतिहास उजेडात

सकाळचे संपादक (युवा) संदीप काळे यांनी प्रास्ताविक केले. सकाळच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. सहयोगी संपादक राजेश सोळसकर यांनी सूत्रसंचालन केले.

अर्थव्यवस्था न सुधारल्यास अराजकता

जगभरात चीन या देशाशी असलेले संबंध तणावपूर्ण झालेले आहेत. दोन्ही देशांचे प्रश्न मैत्रीपूर्ण मार्गाने सोडविण्याची गरज आहे. भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी होत चालली असून, चीन व भारताच्या तणावाचे परिणाम दोन्ही देशांवर होत आहेत. याचबरोबर येत्या काळात भारताची अर्थव्यवस्था सुरळीत न झाल्यास अराजकता निर्माण होण्याची भीती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataraBookShriram Pawar
loading image
go to top