'पदवीधर'च्या प्रचारातील रस्सीखेचामुळे सातारकरांची मतदानातही आघाडी

सिद्धार्थ लाटकर
Tuesday, 1 December 2020

प्रत्येक बूथमधील निवडणूक कर्मचाऱ्यांसह मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मास्क बंधनकारक केले आहे. कोरोनामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील मतदान केंद्रावर आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे यांनी सांगितले.

सातारा : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) सकाळपासून मतदानास प्रारंभ झालेला आहे. सातारा शहरातील महाराजा सयाजीराव हायस्कूल, आझाद काॅलेज येथे मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. नागरिकांबराेबरच प्रशासनातील अधिकारी देखील आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. 

पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर तसेच भाजपचे संग्रामसिंह देशमुख व जितेंद्र पवार यांच्यातच लढत हाेईल असे अंदाज बांधला जात आहे. सर्वच उमेदवारांचा जिल्ह्यात उत्तमरित्या प्रचार झालेला आहे.  

आज (मंगळवार) जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही आझाद काॅलेज मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. आमदार शशिकांत शिंदे यांनी महाराजा सयाजीराव हायस्कूल येथील मतदान केंद्रावर भेट दिली. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील विविध मतदान केंद्रावर भेटी देताहेत. 

पदवीधर निवडणुकीसाठी जिल्ह्यात 59 हजार 70 मतदारांसाठी 132 मतदान केंद्रे आहेत. "शिक्षक'साठी सात हजार 710 मतदारांसाठी 44 मतदान केंद्रे आहेत. कोविड संसर्गाच्या काळात होणारी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ ही पहिलीच निवडणूक असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांमध्ये सुरक्षित अंतर राहण्यासाठी बूथच्या बाहेर उभे राहण्यासाठी ठराविक अंतरावर वर्तुळे तयार करून बूथमधील मतदान कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येक बूथनिहाय कोरोनाविषयी आवश्‍यक सूचनांचे माहिती फलक लावण्यात आले आहेत.

कोयना धरणावरील महाकाय अजगराचा युवकांनी वाचविला जीव
 
""कोरोनाच्या संसर्गामुळे आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात आली असून, मतदारांची थर्मल स्क्रिनद्वारे तपासणी करण्यात येत आहे, तसेच प्रत्येक बूथमधील निवडणूक कर्मचाऱ्यांसह मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मास्क बंधनकारक केले आहे. कोरोनामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील मतदान केंद्रावर आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Graduate Constituency Election Voting In Satara Trending News