esakal | लसीकरणात 'आरोग्य'चा ढिसाळ कारभार; आयुष्याच्या उतरत्या वयात वयोवृध्दांची हेलपाटे
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccination

लसीकरणात 'आरोग्य'चा ढिसाळ कारभार; आयुष्याच्या उतरत्या वयात वयोवृध्दांची हेलपाटे

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : कोविड लसीकरणाचा (Covid Vaccination) ४५ वर्षावरील टप्पा पूर्ण होण्याअगोदरच १८ वर्षावरील लसीकरण (Vaccination) जिल्ह्यात सुरु आहे. सध्या १८ वर्षावरीलच लस प्राधान्याने, तर ४५ वर्षावरील नागरिकांना उपलब्ध होईल तशी ती जिल्ह्यातील केंद्रांवर दिली जात आहे. लसीसाठी पहाटे चारपासूनच वयोवृध्द रांगेत उभे राहत आहेत. मात्र, आठ वाजता आरोग्य कर्मचारी आल्यावर त्यांना लस येणार नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळीही लसीसाठी वयोवृध्दांवर हेलपाटे मारायची वेळ आली आहे. (Queues Of Citizens For Covid Vaccination At Karad Satara News)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणासाठी शासनाने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस उपलब्ध केली आहे. ४५ वर्षावरील सर्वांना ती शासकीय रुग्णालयात मोफत दिली जाते. त्यासाठी पहिल्यांदा नागरिकांनी फारशी उत्सुकता दाखवली नाही. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लस घेण्यासाठी सध्या सर्वजण गर्दी करत आहेत. ४५ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्याअगोदरच १८ वर्षावरील सर्वांना ती एक मे पासून सुरु केली आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे सुरु आहे. ज्यांनी नोंदणी केली आहे. त्या १८ वर्षावरील संबंधितांना लस प्राधान्याने दिली जात आहे.

भारीच! आमदार फंडातून ऑक्‍सिजन प्लांटची निर्मिती; शासनाकडून 90 लाखांचा निधी

मात्र, ४५ वर्षावरील नागरिकांना ती उपलब्ध होईल तशी दिली जात आहे. लस मिळावी यासाठी पहाटे चारपासून वयोवृध्द पुरुष-महिला रांगा लावत आहेत. आयुष्याच्या उतरत्या वयात कोरोनापासून वाचण्यासाठी त्यांची ही धडपड सुरु आहे. मात्र, त्यांना सकाळी आठ वाजता आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लस आज येणार नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे त्यांना नाईलाजाने घरी जावे लागते. असे आठवड्याहून अधिक काळ त्यांचे दररोज सुरु आहे. आवश्यक त्या प्रमाणात लसच उपलब्ध होत नसल्याने या वयातही हेलपाटे घालून त्यांच्या तोंडाला फेस आला आहे. त्यावर प्रशासनाने आता पर्याय काढावा, अशी आर्त साद त्यांनी घातली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी शेड्यूल जाहीर करावे

जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर ४५ वर्षावरील सर्वांची लसच सध्या उपलब्ध होत नाही. आली तरी ती रांगेत असलेल्यांना पुरत नाही. त्यातच ती येणार आहे, की नाही हेही आदल्या दिवशी सांगितले जात नाही. त्यामुळे दररोज रांगेत उभे राहण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. त्यामध्ये वयोवृध्दांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचा विचार करुन जिल्हाधिकारी कार्यालयानेच पुढाकार घेवून लसीकरणाचे शेड्यूल आदल्यादिवशी जाहीर करण्याची गरज आहे.

Good News : जिल्हा बॅंकेकडून व्हेंटिलेटरसाठी तीन कोटी; आमदार शिवेंद्रसिंहराजे, रामराजेंचा पुढाकार

Queues Of Citizens For Covid Vaccination At Karad Satara News