esakal | पत्नीशी फोनवर बोलल्याच्या कारणावरून पतीकडून कामगाराचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

Mobile

चिंचणेर निंब (ता. सातारा) येथे पत्नीशी फोनवर बोलत असल्याच्या कारणावरून पतीने एका कामगाराचा कोयत्याने वार करून खून केला आहे.

पत्नीशी फोनवर बोलल्याच्या कारणावरून पतीकडून कामगाराचा खून

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : चिंचणेर निंब (ता. सातारा) येथे पत्नीशी फोनवर (Mobile) बोलत असल्याच्या कारणावरून पतीने एका रेल्वे ट्रॅकच्या कामावरील कामगाराचा कोयत्याने वार करून खून केला आहे. संशयिताला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. मनोहर श्रीकांत कांबळे (Manohar Kamble) (वय ३५, मूळ रा. मांजरेवाडी ता. चिकोडी, जि. बेळगाव) असे खून झालेल्याचे, तर शरद सुग्रीव सरवदे (Sharad Sarvade) (रा. चिंचणेर वंदन) असे खून करणाऱ्याचे नाव आहे. (Railway Track Worker Case In Chinchner Nimb Satara Crime Marathi News)

याप्रकरणी बांधकामावरील अभियंता प्रतीक विठ्ठल गवळी (वय २६, मूळ रा. विटा, ता. खानापूर, जि. सांगली) यांनी तालुका पोलिस ठाण्यात (Satara Taluka Police Station) फिर्याद दिली आहे. गवळी हे अभियंता आहेत. सातारा ते कोरेगाव या रेल्वे ट्रॅकवर त्याच्या कंपनीमार्फत काम सुरू आहे. यासाठी लागणारे कामगार सध्या चिंचणेर निंब गावच्या हद्दीत रेल्वे गेटलगत राहतात. मनोहर कांबळे ही तेथे कामगार होता. सर्व कामगारांना जेवण देण्याचे काम शरद सरवदे व त्याचे कुटुंबीय करत होते. त्यामुळे कांबळेची सरवदे कुटुंबीयांशी ओळख होती. बारा दिवसांपूर्वी मनोहर व आपली पत्नी फोनवर बोलत असल्याचे सरवदे याला समजले. त्या वेळी त्यांच्यात वादावादी झाली होती.

हेही वाचा: पंढरपुरात राजकीय मेळावे चालतात, मग पायी वारी का नको?; अक्षयमहाराजांचं टीकास्त्र

काल रात्री कामगार साडेनऊला एकत्र जेवणासाठी बसले. त्या वेळी मनोहरला त्यांनी जेवणासाठी बोलावले; परंतु तो फोनवर बोलत होता. तो बोलत बोलत जुन्या रेल्वे गेटच्या वडाच्या झाडाकडे गेला. या वेळी अचानक त्याच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे सर्व कामगार तेथे गेले. तेव्हा मनोहर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, तर सरवदे तेथून कोयता घेऊन पळून जात असल्याचे इतरांना दिसले. कामगारांनी मनोहरला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस घटनास्थळी व रुग्णालयात गेले. घटनेची माहिती घेतल्यानंतर त्यांनी पंचनामा करून संशयिताच्या शोधासाठी पोलिसांचे दुसरे पथक पाठवले. पहाटे सरवदेला अटक करण्यात आली.

Railway Track Worker Case In Chinchner Nimb Satara Crime Marathi News