ऑलिम्पियन प्रवीण जाधवच्या 'वादात' साताऱ्याच्या नेत्यांची उडी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Archer Pravin Jadhav

ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympic) खराब कामगिरीमुळे अनेक खेळाडूंना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे, तर त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या देण्याचाही प्रकार सुरु आहे.

ऑलिम्पियन प्रवीण जाधवच्या 'वादात' साताऱ्याच्या नेत्यांची उडी!

सातारा : ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympic) खराब कामगिरीमुळे अनेक खेळाडूंना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे, तर त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या देण्याचाही प्रकार सुरु आहे. असाच प्रकार साताऱ्याच्या प्रवीण जाधवच्या (Archer Pravin Jadhav) कुटुंबीयांच्या बाबतीत घडला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर घरादारासह जिल्ह्याच सोडण्याची वेळ आली आहे. या वादात आता सातारा जिल्ह्याच्या नेत्यांनी उडी घेतली असून प्रवीणच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभा राहण्याचा निर्धार केला आहे. तसेच गाव पातळीवरील हा वाद सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिलीय.

सातारच्या प्रवीणने तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात अतानू दास आणि तरुणदीप राय सोबत भाग घेतला होता, तर मिश्र दुहेरीमध्ये प्रवीणने दीपिकाकुमारी सोबत भाग नोंदवला होता. आज (बुधवार) विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) यांनी, जाधव कुटुंबीयांवर गाव सोडण्याची अजिबात वेळ येणार नाही आणि ती मी कदापि येऊ देणार नाही. हा वाद सोडविण्यासाठी मी यात स्वत: लक्ष घालत असून हे प्रकरण लवकरच मिटवू, तसेच प्रवीणने केवळ खेळावर लक्ष देण्यासाठी प्रयत्न करावेत, त्याने त्याचे करिअर तयार करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी देखील उडी घेतली असून ते म्हणाले, ऑलिम्पियन प्रवीणच्या कुटुंबीयांचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. याबाबत मी त्याच्या कुटुंबीयांशी लवकरच भेट घेणार असून मी स्वतः पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे. बिकट परिस्थितीवर मात करत प्रवीणने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद असंच आहे. त्याच्या या कामगिरीने जिल्ह्याचे व देशाचे नाव उंचावले आहे. त्याच्या कुटुंबीयावर घर सोडण्याची वेळ आली असली, तरी आम्ही ती येऊ देणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.