

फलटण: दोन दिवसांपूर्वी फलटण येथे डॉक्टर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूचे कारण हातावर लिहून ठेवले आहे. अशाप्रसंगी विरोधकांनी माझ्या विरोधात गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. मात्र, आम्ही कधीही चुकीचे राजकारण केले नाही. मलाही दोन मुली आहेत; परंतु अशा प्रकरणाशी नाव जोडल्यानंतर मनाला हळहळ होते, असे सांगताना रणजितसिंह नाईक-निंबाळकर भावुक झाले. ते म्हणाले, ‘‘काही लोक स्वत:ला शहेनशहा समजतात. आमच्याकडची जहागिरी गेली. मात्र, त्यांच्याकडची फुगिरी गेली नाही. आमचे मन आणि आत्मा साफ आहे, तोपर्यंत कुणाला घाबरणार नाही.’’ आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. डॉक्टर, तसेच दोन्ही संशयितांचे मोबाईल चॅटिंग आणि सीडीआर रिपोर्ट तपासला पाहिजे. या दुर्दैवी घटनेचे कोणीही समर्थन करणार नाही. फलटणकरांना या घटनेने धक्का बसला आहे. विशेष न्यायालयात हा खटला जलदगतीने चालवला जावा, असेही ते म्हणाले आहेत.