
उंब्रज : येथील अंधारवाडी रस्ता, तसेच शिवडे फाटा येथील सेवा रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत सुमारे सहा लाख ८० हजार रुपये किमतीचे साडेसात तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या दोन घटना आज घडल्या. पोलिस दप्तरी मात्र तीन लाख रुपयांची नोंद झाली आहे. आज सकाळी सातच्या सुमारास या घटना घडल्या. दोन वेगवेगळ्या ठिकाणी काही क्षणांतच हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. फिर्यादीवरून अज्ञातांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.