
दहिवडी : बिजवडी (ता. माण) चारा छावणीतील भ्रष्टाचार प्रकरणी दहिवडी न्यायालयाचे आदेशाने गुन्हा नोंद असून चारा छावणी दफ्तर तपासणी प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असा आरोप संजय भोसले यांनी केला आहे.
संजय भोसले म्हणाले, सदर गुन्ह्याच्या तपासकामी चारा छावणी रोज किर्द (जमा, खर्च) रजिस्टर हे यशवंत म्हंकाळ गाढवे (वय : ५३ वर्षे, रा.बिजवडी ता.माण) यांनी समक्ष हजर केलेने ते दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे. असे दहिवडी पोलिसांनी नमूद केले. त्यामुळे या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले आरोपी वि. का. सेवा सोसायटीचे चेअरमन यशवंत नामदेव शिनगारे व सचिव विकास दिनकर भोसले यांना ३० मे २०२१ रोजी न्यायालयामध्ये हजर करुन त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
याबाबत काही कागदपत्रे आम्हाला मिळून आलेली असून संबंधित यशवंत गाढवे यांनी स्वत:च १ जून २०२१ रोजी पोलिस अधिक्षक सातारा, पोलीस महानिरिक्षक कोल्हापूर आणी पोलिस उप अधिक्षक दहिवडी यांचेकडे लेखी तक्रार दाखल करुन वरील सर्व खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी अर्जामध्ये पुढे म्हटले आहे की, गु.र.नं. ६२/२०२१ दहिवडी पो.स्टे. येथे २९ मे २०२१ रोजी माझेकडून पोलिसांनी धमकावत खोटा रजिस्टर जप्तीचा पंचनामा केलेला असून या गंभीर प्रकाराची चौकशी व्हावी.
यावरुन दहिवडी पोलिसांचा संबंधित गुन्ह्याचा सुरु असलेला तपास संशयाच्या भोवर्यात अडकला असून जिल्हा पोलिस प्रमुख सदर प्रकार गंभीरतेने घेतील काय? असे संजय भोसले यांनी म्हटले आहे.