esakal | ...तर जनतेच्या पदरी यंदाही वनवास

बोलून बातमी शोधा

भुडकेवाडी : पुलावरून पाणी वाहण्यामुळे विस्कळित झालेली वाहतूक व अडकलेले लोक. (संग्रहित छायाचित्र)

पूर आला, की अनेक समस्यांच्या चर्चा जोर धरतात आणि जसा तो ओसरतो, तशाच चर्चाही ओसरायला लागतात अन्‌ पुन्हा "ये रे माझ्या मागल्या' या म्हणीचा प्रत्यय घेत बिचारी जनता समस्यांचे निराकरण न झाल्याने वर्षानुवर्षे पुराशी तोंड देत, वनवासाचं जगणं जगत राहते. तसाच प्रकार पाटण तालुक्‍यातील तारळे विभागातही यंदा घडताना दिसल्यास नवल वाटायला नको. 

...तर जनतेच्या पदरी यंदाही वनवास

sakal_logo
By
यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : तारळे विभागाला पावसाळ्यात गेली काही वर्षे भुडकेवाडी फाटा, तोंडोशी व मालोशी आळी दरम्यानच्या ओढ्यांवरील कमी उंचीच्या पुलांमुळे वाहतूक ठप्प होती. याही वर्षी पुलांच्या उंचीअभावी जनतेला पावसाळ्यात या समस्येला तोंड द्यावे लागण्यासारखी स्थिती संभावते आहे. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा फटका हजारो जनतेला बसणार आहे. 

तारळे विभागात पावसाळ्यात अतिवृष्टी होते. जुलै, ऑगस्टमध्ये पावसाच्या मुसळधार सरी कोसळत असतात. अशात विभागातील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहिल्याने वाहतूक ठप्प होण्याचे ग्रहण काही वर्षांपासून लागले आहे. कधी तास- दोन तास तर कधी कधी दिवसभर ही वाहतूक ठप्प होते. काटेवाडी, मुरूड दरम्यानचा भुडकेवाडी फाट्यावरील पूल मुसळधार पावसात कायम पाण्याखाली जातो. तर त्यास पर्यायी रस्ता असलेल्या तारळे- बांबवडे- मुरूड रस्त्यावरील तोंडोशीजवळचा पूलही पाण्याखाली जात असल्याने मुरूड विभागातील लोकांना तासन्‌तास ताटकळत बसावे लागते. 

हे दोन्ही पूल पाण्याखाली जाण्याने मुरूड, आवर्डे, धुमकवाडी, कुशी गावठाण, लोरेवाडी, गोरेवाडी, डिगेवाडी, मालोशी, आळी, पाडेकरवाडी, डोणी, घाटेवाडी आदी गावांतील हजारो लोकांचा संपर्क तुटतो, तर मालोशी आळी दरम्यानच्या पुलाची ओढ्यापासूनची उंची फक्त तीन- चार फुटाचीच असल्याने अगदी थोड्या पावसातही फरशीवरून पाणी वाहते. याचा संपूर्ण पावसाळभर चार गावांना त्रास भोगावा लागतो. काही जण धोकादायक पद्धतीने पूल ओलांडतात, तर रात्रीच्या वेळी हा धोका शतपटीने वाढतो. 

गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या पावसात हे पूल बहुतांशी वेळ पाण्यातच राहिले. यामुळे त्यांचे ऑडिट होऊन उंची वाढविणे गरजेचे होते. मात्र, याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे यंदाही पुराच्या पाण्यातून धोकादायक पद्धतीने वाट काढत लोकांना जावे लागणार हे निश्‍चित. 

जनतेने बाजूला केलेल्यांची नोंद कशाला घ्यायची : शरद पवार