खटावची कलिंगडे थंडीमुळे गारठली; आखाती देशातील वातावरणाचा फटका

आयाज मुल्ला
Friday, 8 January 2021

'गिरीश' या वाणाच्या कलिंगडाचे वजन आठ ते दहा किलोंपासून पुढे आहे. भारदास्त आकार व वजन, तसेच गोड चवीमुळे दुबई, कतार आदी आखाती देशांत कलिंगडाच्या या वाणाला मोठी मागणी असते.

वडूज (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यांतील मांडवे, शिरसवडी येथील शेतकऱ्यांनी आखाती देशांत मागणी असणाऱ्या कलिंगडाचे चांगले उत्पादन घेतले आहे. मात्र, सध्या आखातात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे कलिंगडांची निर्यात रोडावल्याने मागणी थंडावली आहे. 

"गिरीश' या जातीच्या कलिंगडाच्या वाणाची मांडवे येथील पोलिस पाटील व प्रगतशील शेतकरी, राज्य शासनाचे कृषिनिष्ठ पुरस्कार विजेते दत्तात्रय ऊर्फ दाजी पाटील यांनी 7 एकर व शिरसवडीचे रोहन कांबळे यांनी 3 एकर क्षेत्रात लागवड केली आहे. श्री. पाटील यांना शासनाचे विविध पुरस्कार मिळाले आहेत. प्रयोगशील युवा शेतकरी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळे जिल्हा- परजिल्ह्यांतील अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला सातत्याने भेट देण्यासाठी येतात. शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शनही ते करतात. 

सातारा जिल्ह्यात अवकाळीची दमदार हजेरी; माण, खटाव, महाबळेश्वरात पीक, फळबागांचे मोठे नुकसान

"गिरीश' या वाणाच्या कलिंगडाचे वजन आठ ते दहा किलोंपासून पुढे आहे. भारदास्त आकार व वजन, तसेच गोड चवीमुळे दुबई, कतार आदी आखाती देशांत कलिंगडाच्या या वाणाला मोठी मागणी असते. या कलिंगडाची वरची साल जाड व कडक असल्याने एक महिनाभरापर्यंत हे कलिंगड टिकू शकते. त्यामुळे शेतातून तोडणी करून आखाती देशांत ते जाईपर्यंत व्यवस्थित राहते. या शेतकऱ्यांनी "गिरीश'चे एकरी 30 ते 40 टनापर्यंत उत्पादनही घेतले आहे. आखाती देशांत मोठी मागणी असताना शेतकऱ्यांना 12 ते 15 रुपये प्रतिकिलोपर्यंत दरही मिळाला आहे. सध्या आखाती देशांत थंडीचे वातावरण असल्याने कलिंगडांची मागणीही कमी झाल्याने निर्यात रोडावली आहे. मागणी कमी असल्याने शेतकऱ्यांना दराचाही फटका बसला आहे. 

महाबळेश्वर : वनसदृश्य मिळकतींची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध; आक्षेपासाठी कागदपत्र दाखल करा!

गिरीश' या कलिंगडाच्या वाणाला आखाती देशांत चांगली मागणी आहे. त्यामुळे आणखी काही शेतकरी या वाणाच्या लागवडीसाठी उत्सुक आहेत. मात्र, बदलत्या हवामानाचा फटका शेती उत्पादनाला बसत आहे. 
-दत्तात्रय ऊर्फ दाजी पाटील, प्रगतशील शेतकरी, मांडवे 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Agricultural News Damage To Watermelon Crop Due To Climate Change At Khatav