ढगाळ वातावरणाचा कोरेगाव तालुक्‍याला जबर फटका; पावसामुळे ज्वारी, गहू, कांदा पिकाचे मोठे नुकसान

राहुल लेंभे
Wednesday, 13 January 2021

अवकाळीने हातातोंडाशी आलेली रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, घेवडा, कांदा आदी पिके अडचणीत आली आहेत. ढगाळ वातावरण व पाऊस या दुहेरी संकटाने तालुक्‍यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : कोरेगाव तालुक्‍याच्या उत्तर भागात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाने ज्वारीचे पीक भुईसपाट झाले असून, शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.

गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवस दुपारी सर्कलवाडी, चौधरवाडी, वाघोली, सोनके, पिंपोडे बुद्रुक, करंजखोप, रणदुल्लाबाद, दहिगाव या गावांच्या शिवारात चांगला पाऊस झाला. वारा व पावसाने जोमदार वाढलेले ज्वारीचे पोटऱ्यात आलेले पीक भुईसपाट झाले आहे. पोटऱ्यात पाणी गेल्यास कणीस उमलण्याआधीच कुजून जाण्याची भीती आहे. धुके व पावसामुळे स्ट्रॉबेरी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

भाविकांनाे! श्री यमाईदेवीच्या मंदिराचे दरवाजे तात्पुरते राहणार बंद  

अवकाळीने हातातोंडाशी आलेली रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, घेवडा, कांदा आदी पिके अडचणीत आली आहेत. ढगाळ वातावरण व पाऊस या दुहेरी संकटाने तालुक्‍यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. कोरोनामुळे केलेल्या लॉकडाउनने कोलमडून पडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकडून मोठ्या उत्पन्नाच्या अपेक्षा होत्या. अवकाळी पावसाचे संकट दूर व्हावे याकरिता शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी तातडीने हालचाली कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सातारकरांनाे! बिनधास्त खा अंडी, चिकन; कुक्कुटपालकांसह पशुसंवर्धन दक्ष  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Agricultural News Loss Of Sorghum Wheat Onion Crop Due To Rains In Koregaon Taluka