सातारा : महिलांनो, अहिल्याबाईंचा वसा घ्या

उपसभापती नीलम गोऱ्हे; माण व खटाव तालुक्यांतील महिलांना बियाणांचे मोफत वाटप
satara
satarasakal

म्हसवड : कोरोना साथीत पती गमावलेल्या महिलांनी खचून न जाता अहिल्याबाई होळकरांचा वसा घेऊन नव्याने पुन्हा त्याच जोमात आपले आयुष्य जगावे, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले.

कोरोना साथीत पती गमावलेल्या माण व खटाव तालुक्यांतील महिलांना येथील माण देशी फाउंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालय व कृषी विभाग यांच्या वतीने खरीप हंगामासाठी बाजरी, सोयाबीन, मका व मूग बियाणांचे मोफत वाटप कार्यक्रमात त्या ऑनलाइन उपस्थित राहून मार्गदर्शन करत होत्या. या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, माण देशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर, माण तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, खटाव तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर, माण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, माण देशी महिला सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी, माण देशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, माण देशी किसान प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा वनिता पिसे आदी उपस्थित होते.

गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करताना आपली जमीन सांभाळून त्यातून नव्या उमेदीने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागणार आहे. शासनातर्फे कशी जास्तीत जास्त मदत देता येईल, यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नशील आहोत. संबंधित महिलांना आणखी कोण कोणती मदत करता येईल, यासाठी मी स्वत: चेतना सिन्हा यांच्याबरोबर वेळोवेळी चर्चा करीत असते.’’

शेखर सिंह म्हणाले,‘‘कोरोना साथीत आई-वडील दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची संख्या २५ आहे. या मुलांना शिक्षण व पालकत्वाची जबाबदारी स्वीकारणे खुपच गरजेचे आहे.’’

श्रीमती सिन्हा यांनी माण देशी फाउंडेशनने कोरोना साथीत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमात माण व खटाव तालुक्यांतील १६० एकल महिलांना प्रत्येकी २५ किलो सोयाबीनच्या एकूण ४० बॅग, तीन किलोप्रमाणे एकूण २६० बॅग बाजरी, चार किलोप्रमाणे एकूण १३० बॅग मका आणि एक किलोप्रमाणे १३० बॅग मूग बियाणे मोफत वाटप करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com