Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस गुरफटली पाडापाडी अन्‌ जिरवाजिरवीत! बरं झालं अजितदादांनीच टोचले कान...

सातारा जिल्हा राष्ट्रवादी अंतर्गत सुरू असलेले पाडापाडीचे व जिरवाजिरवीच्या राजकारणावर खुद्द राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बोट ठेवले.
Ajit Pawar
Ajit PawarSakal
Summary

सातारा जिल्हा राष्ट्रवादी अंतर्गत सुरू असलेले पाडापाडीचे व जिरवाजिरवीच्या राजकारणावर खुद्द राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बोट ठेवले.

सातारा - जिल्हा राष्ट्रवादी अंतर्गत सुरू असलेले पाडापाडीचे व जिरवाजिरवीच्या राजकारणावर खुद्द राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बोट ठेवले. त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना आपण दोन खासदार, नऊ आमदारांवरून एक खासदार व तीन आमदारांवर आलो आहोत, त्यामुळे आत्मचिंतन करा, असा सल्लाही दिला. त्यामुळे पक्षांतर्गत खदखद नेत्यांपर्यंत पोचली आहे. आता जिल्ह्यातील नेत्यांनी सुधारणा केली नाही, तर टपून बसलेला भाजप संधी साधणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी मी आणि माझा मतदारसंघ थोडा बाजूला ठेऊन बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

सातारा जिल्हा १९९९ मध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला. त्या वेळी दोन खासदार व नऊ आमदार निवडून आले होते. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर जिल्ह्यातील जनतेने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर प्रेम केले अन् साथही दिली. कॉँग्रेसनंतर राष्ट्रवादी जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोचला; पण या बालेकिल्ल्याचे बुरूज ढासळू लागले आहेत. पाटण, कोरेगाव, सातारा-जावळी हे तीन मतदारसंघ हातून गेले आहेत. माण- खटावमध्ये आमदार निवडून आणता आलेला नाही, तर हक्काचा सातारा- जावळी मतदारसंघातही पक्षाकडे निवडून येऊ शकणारा नेता नाही. बालेकिल्ल्याला सुरुंग लागला तो कोरेगाव मतदारसंघात. आमदार शशिकांत शिंदेंना नवख्या महेश शिंदेंनी पराभूत केले. शशिकांत शिंदेंच्या पराभवालाही राष्ट्रवादी अंतर्गत जिरवाजिरवीचे राजकारणच कारणीभूत आहे.

ज्या शशिकांत शिंदेंनी सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंना पक्षात घेण्याची आग्रही भूमिका घेतली, त्यांच्या ताब्यातील एक एक करत सर्व सत्तास्थाने हिसकावून घेतली गेली. राष्ट्रवादीत एकीकडे पाटील गट, तर दुसरीकडे राजे गट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन गटातच सत्तेची सर्व समीकरणे जुळविण्यासाठी फासे टाकले जातात. जुन्या- जाणत्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोणतीही संधी मिळत नाही. पक्ष संघटनेतील निवडीतही आमदार, खासदार यांच्या जवळचा नात्यातील शोधून पदे दिली जातात. त्यामुळे ज्येष्ठ नेते पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आजही ससेहोलपट सुरू आहे. त्यामुळे आयुष्यभर आम्ही दार धरायचे आणि सतरंज्याच उचलायच्या का? अशी विचारणा सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून होत आहे. हा त्यांचा आवाज नेत्यांपर्यंत पोचूनच दिला जात नाही.

गट- तट, अंतर्गत वाद, हेवे-दावे, जिरवा- जिरवीच्या राजकारणाने राष्ट्रवादीला गुरफटले आहे. जिल्ह्यातील कोणताच नेता अथवा कार्यकर्ता शरद पवारांपुढे हे सर्व मांडू शकत नाही; पण दीपक पवारांनी मेढ्याच्या सभेत आवाज उठवून या सर्व परिस्थितीला तोंड फोडले. तोच धागा पकडून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पक्षांतर्गत परिस्थितीवर बोट ठेवले. नेत्यांना पाडापाडीचे व जिरवाजिरवीचे राजकारण थांबवण्याचा सल्ला दिला. तो मानून जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी बालेकिल्ला वाचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा, टपून बसलेला भाजप संधी साधून जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी मी आणि माझा मतदारसंघ थोडा बाजूला ठेवत बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

दीपक पवारांनी फोडले तोंड…

जिल्ह्यातील कोणताच नेता अथवा कार्यकर्ता ज्‍येष्ठ नेते शरद पवारांपुढे पक्षाची सद्यःस्थिती सांगू शकत नाही. मात्र, दीपक पवारांनी मेढ्याच्या सभेत आवाज उठवून या सर्व परिस्थितीला तोंड फोडले. तोच धागा पकडून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पक्षांतर्गत परिस्थितीवर बोट ठेवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com