
Satara: कऱ्हाडसाठी पर्यायी मार्ग हवाच;लोकप्रतिनिधींनी उचलावे पाऊल
Satara- कऱ्हाड हे मध्यवर्ती शहर आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकण जोडणारा हा दुवा आहे. त्यामुळे या शहराला दळणवळणाच्या दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे.
शहराच्या प्रवेशाद्वारावरील कोल्हापूर नाक्यावरील महामार्गावरील पूल पाडण्यास सध्या सुरुवात झाली आहे.
त्यामुळे कऱ्हाडच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. त्यातून कऱ्हाडला पर्यायी मार्गाची गरज अधोरेखित झाली आहे.
त्यासाठी कऱ्हाडच्या कोयनेश्वराजवळून गोटेजवळ महामार्गाला जोडणारा दुसरा पूल प्रस्तावित होता. मात्र, तोही गुलदस्त्यातच आहे.
परिणामी, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास कऱ्हाडला पर्यायी मार्गच नसल्याने अशावेळी नेमके करायचे काय? हा प्रश्न सध्या कऱ्हाडकरांसमोर उभा आहे.
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड हे मध्यवर्ती शहर आहे. कृष्णा- कोयना या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर वसले आहे. कऱ्हाडला राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, ऐतिहासिक, तसेच औद्योगिकदृष्ट्या संपन्न व प्रगत शहर म्हणून ओळखले जाते.
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांची कऱ्हाड ही कर्मभूमी. यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते, तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही हे गाव. सलग ४२ वर्षे कऱ्हाडचे नगराध्यक्षपद भुषवणारे ज्येष्ठ नेते (कै.) पी. डी. पाटील हेही कऱ्हाडचेच आहेत.
ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते हे कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावचे. त्यामुळे कऱ्हाड हे पश्चिम महाराष्ट्रात नावाजलेले व प्रगत शहर आहे. या शहरातून कोकणात आणि कर्नाटकातही जाता येते.
त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीनेही हे शहर महत्त्वाचे आहे. या शहराजवळून पुणे-बंगळूर महामार्गही गेला आहे. शहरालगत विमानतळ आहे.
तर लोहमार्गही शहराजवळ आहे. महामार्गाचे कोल्हापूर नाका हे शहरात येण्याचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातच महामार्गावर २००४ मध्ये उड्डाणपूल उभारला होता.
सध्या महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामासाठी अस्तित्वातील एकेरी पूल पाडून सहा पदरीकरणाचा दुहेरी पूल बांधण्यात येणार आहे.
त्यासाठी जुना पूल पाडण्यात येत आहे. त्यामुळे वाहतुकीची दररोज कोंडी होत आहे. त्याचा परराज्यातून येणाऱ्या वाहनांसह कऱ्हाडकरांनाही मोठा फटका बसला आहे. कऱ्हाडला पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी वाढत आहे.
कऱ्हाडला कोयनेश्वराजवळून गोटे गावाजवळ महामार्गाला जोडणारा पूल उभारण्याचा प्रस्ताव माजी सहकारमंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांनी मांडला होता. कालांतराने त्यावर चर्चाच झाली नाही. त्यामुळे तो प्रस्तावही बारगळला.
तो पूल आज अस्तित्वात असता तर कऱ्हाडच्या वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला असता. त्याचबरोबर सध्या कोडोली ते पाचवडेश्वर पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे.
त्या पुलाचाही मोठा उपयोग कऱ्हाडमधून तासगाव, पलूस, कुंडलला जाणाऱ्या वाहतुकीसाठी होणार आहे. मात्र, तोही पूल सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूकही कऱ्हाडमधूनच जात आहे.
तासवडे येथील टोलनाका वाचवण्यासाठी होणारी वाहतूकही कऱ्हाड शहरातूनच होते. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यावर, आपत्कालीन परिस्थितीवेळी कऱ्हाड शहराला तातडीचा मार्गच उपलब्ध नाही.
सध्या कोल्हापूर नाक्यावरील पूल पाडण्याची कार्यवाही सुरू झाल्याने आता या पर्यायी मार्गाची कऱ्हाडकरांना प्रकर्षाने गरज भासू लागली आहे.