esakal | नेर प्रकल्पाच्या भिंतीची उंची वाढवण्यास मान्यता
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

जिहे-कटापूर उपसा जलसिंचन योजनेसंदर्भात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीत नेर मध्यम प्रकल्पाच्या भिंतीची उंची वाढवण्यास आणि त्यातील गाळ काढण्यास मंत्री पाटील यांनी यावेळी तत्त्वत: मान्यता दिली.

नेर प्रकल्पाच्या भिंतीची उंची वाढवण्यास मान्यता

sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : दुष्काळी भागासाठी वरदान ठरणाऱ्या जिहे-कटापूर उपसा जलसिंचन योजनेचा नाबार्डमध्ये (आरआयडीएफ-26) समावेश करण्याची मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. दरम्यान, नेर मध्यम प्रकल्पाच्या भिंतीची उंची वाढवण्यास आणि त्यातील गाळ काढण्यास मंत्री पाटील यांनी तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली आहे. 

जिहे-कटापूर उपसा जलसिंचन योजनेसंदर्भात जलसंपदामंत्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीत "जिहे-कटापूर'योजनेचा विस्तृत आढावा घेण्यात आला. नेर मध्यम प्रकल्पाच्या भिंतीची उंची वाढवण्यास आणि त्यातील गाळ काढण्यास मंत्री पाटील यांनी यावेळी तत्त्वत: मान्यता दिली. या योजनेतून वंचित राहिलेल्या मोळ-डिस्कळ, रणसिंगवाडी, राजापूर, विसापूर, दरुज-दरजाई परिसरातील गावांना न्याय देण्यासाठी योजनेला निधी वाढवून देण्याची नितांत आवश्‍यकता असल्याचे आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.

योजनेतून पाणी उचलून नेण्यापेक्षा बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी नेणे सोयीस्कर होणार आहे. त्यासाठी सुमारे 167 कोटी एवढ्या निधीची गरज आहे. त्यामुळे या योजनेचा "नाबार्ड'मध्ये (आरआयडीएफ-26) समावेश करावा, अशी मागणीदेखील आमदार शिंदे यांनी केली. दुष्काळी भागाला न्याय देण्याची शासनाची भूमिका असल्याने यासंदर्भात तातडीने निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही जलसंपदामंत्री पाटील यांनी बैठकीत दिल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. 


संपादन : पांडुरंग बर्गे  

loading image
go to top