औंध संगीत महोत्सवास दिमाखदार सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औंध संगीत महोत्सवास दिमाखदार सुरुवात

औंध संगीत महोत्सवास दिमाखदार सुरुवात

औंध (सातारा) : 81 व्या औंध संगीत महोत्सवाचे ऑनलाईन प्रक्षेपण रविवारी शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या युट्यूब चॅनल व औंध संगीत महोत्सव या फेसबूक पेज वर हजारो रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात सुरू झाले.

उत्सवातील पहिल्या सत्राची सुरुवात शास्त्रीय गायक मयूर महाजन यांनी राग नटभैरवच्या गायनाने केली. यात त्यांनी विलंबित एकताल मध्ये गुंज रहि कीरत तुम्हरी आणि भोर भई पंछी जागे अशा २ बंदिशींचे सादरीकरण केले. त्यानंतर द्रुत तीनताल मधील सूरज चंदा ही पं. सी. आर. व्यास यांची बंदिश सादर केली.

त्यानंतर राग परमेश्वरी मध्ये मयूर महाजन यांचे गुरू डॉ.मोहन दरेकर रचित देवी दयानी भगवती ही बंदिश पेश केली. त्यांना तबल्यावर सौरभ क्षीरसागर व हार्मोनियमवर अभिनय रवंदे यांनी साथ केली.

नंतर डॉ.चैतन्य कुंटे यांनी प्रथम राग गुजरी तोडी मध्ये विलंबित आडाचौताल, मध्य लय एकताल व द्रुत तीनताल यात स्वरचित गती पेश केल्या. त्यानंतर राग लाचारी तोडी मध्ये मध्यलय रूपक तालात स्वरचित रचनेचे वादन केले. आणि त्यानंतर राग सिंहेंद्रमध्यम मध्ये पंजाबी तालात स्वरचित टप्पा सादर केला. त्यांना तबल्यावर विभव खांडोळकर यांनी साथ केली.

हेही वाचा: भारताचं 'पॅक-अप', न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये; अफगाणिस्तानही बाहेर

सकाळच्या सत्राची सांगता श्रीमती मंजिरी आलेगावकर यांच्या गायनाने झाली. यांनी राग जौनपुरी मध्ये हूँ तो जैयो ही विलंबित तीनताल मधील बडाख्याल पेश केला व त्याला जोड म्हणून हरदम मौला तेरो नाम ही मध्य तीनताल मधील बंदिश सादर केली.

त्यानंतर राग शुद्ध सारंग मध्ये ख्वाजा दिन ही विलंबित झपताल मधील रचना व हे पथकवा ,ही द्रुत एकतालातील बंदिश, अश्या दोन बंदिशी सादर केल्या. आणि सादरीकरणाची सांगता पं. कुमार गंधर्व यांनी संगीतबद्ध केलेले 'सुनता है गुरूज्ञानी' या कबिर भजनाने केली. त्यांना तबल्यावर अजित किंबहुने व हार्मोनियम वर सौरव दांडेकर यांनी साथ केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या सहसचिव अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, सुनील पवार यांनी केले. सायंकाळी उशीरा औंध संगीत महोत्सवाचे दुसरे सत्र सुरू झाले.

Web Title: Satara Aundh Music Festival Got Off To A Great Start

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top