सिद्धनाथाच्या नगरीत वाढली धास्ती...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

सिद्धनाथाची नगरी म्‍हणून प्रसिद्ध असलेल्‍या म्‍हसवड शहराच्या मध्यवर्ती भागातील 58 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातच कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्राची निर्मिती करून तत्काळ 14 दिवसांसाठी शहरातील मुख्य भागाचा परिसर सील केला आहे.

म्हसवड (जि. सातारा) : येथील 58 वर्षीय पुरुष व्यापारी गत काही दिवसांपूर्वी बारामती तालुक्‍यातील एका गावात धार्मिक कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने नऊ जणांसह एकत्रित गेला होता, अशी माहिती आहे. तेथून आल्यावर संबंधित 58 वर्षीय पुरुषास त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याने काही दिवस घरीच उपचार घेतले. परंतु, त्रास वाढू लागल्यावर एका खासगी रुग्णालयात जाऊन डॉक्‍टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार घेण्यासाठी कऱ्हाडला हलवण्यात आले. त्यानंतर त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आला. शनिवारी रात्री तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आणि शहरात खळबळ माजली. 

दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले घरातील सदस्य, वाहनाचा चालक, घरकाम करणारी महिला व बाहेरगावी एकत्रित प्रवास केलेले नऊ जण या सर्व जणांची तपासणी करून ही साखळी कुठपर्यंत जावून थांबतेय, हे तपासणी अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शहरात सध्यातरी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

रविवारी सकाळी माणच्या तहसीलदार बाई माने, सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, तलाठी यू. एन. आकडमल यांच्यासमवेत पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित रुग्णाच्या राहत्या घरी भेट देऊन परिसराची पाहणी केली. सतर्कतेच्या सूचना दिल्या. त्यानंतर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कंटेनमेंट झोन जाहीर करून शहरातील मुख्य भाग सील केला. तसेच शहरात येणारे मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत. 

या प्रश्नावर अजित पवार म्‍हणाले, सातारकरांबद्दल आम्‍हाला अभिमानच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Mhaswad City Was Sealed Due To A Corona Patient