वाई-धोम हत्याकांड : माफीची साक्षीदार ज्योती मांढरे सुनावणीदरम्यान बेशुद्ध; उद्या पुन्हा उलटतपासणी

प्रवीण जाधव
Thursday, 21 January 2021

या हत्याकांडातील प्रमुख आरोपी डॉ. संतोष पोळ याने वाई व धोम परिसरातील सहा महिला व पुरुषांचे खून केले आहेत.

सातारा : वाई- धोम हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे ही आज सुनावणीदरम्यान उलट तपासणी सुरू असताना चक्कर येऊन काही काळ बेशुद्ध पडली. त्यामुळे न्यायालयाने 15 मिनिटांचा ब्रेक घेऊन पुन्हा सुनावणी सुरू केली. उद्या (ता. 22) पुन्हा सुनावणी होणार आहे. 

या हत्याकांडातील प्रमुख आरोपी डॉ. संतोष पोळ याने वाई व धोम परिसरातील सहा महिला व पुरुषांचे खून केले आहेत. मंगल जेधे या महिलेच्या खूनाच्या तपासात स्थानिक गुन्हे विभागाने या प्रकरणातील ज्योती मांढरे व त्यानंतर डॉ. पोळला अटक केली होती. ज्योतीला सरकारी पक्षातर्फे माफीची साक्षीदार करण्यात आले आहे. सध्या जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे कामकाज पाहत आहेत. आज ते न्यायालयात उपस्थित होते. 

म्हसवडच्या उपाध्यक्षांचा राजीनामा; सूर्यवंशींच्या कामगिरीवर 14 नगरसेवकांचा अविश्वास

सकाळी त्यांनी उलटतपास सुरु केला. त्या वेळी माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला न्यायालयात अचानक चक्कर आली. त्यात ती काही काळ बेशुध्दही पडली. या घटनेमुळे न्यायालयातील कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. ज्योतीला उठून बसवून पाणी देण्यात आले. ती शुध्दीवर आल्यानंतर 15 मिनीटांचा ब्रेक घेण्यात आला. ज्योतीने ठीक असल्याचे सांगितल्यानंतर पुन्हा सुनावणीला सुरवात झाली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या हत्याकांडाशी संबंधित असणाऱ्यांनाच न्यायालयात येण्या- जाण्याची परवानगी आहे. या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार आहे. 

माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापूर्वी उदयनराजेंनी जिल्ह्यासाठी काय केलं सांगावं; काँग्रेसच्या नेत्याचं जोरदार प्रतिउत्तर

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Crime News Jyoti Mandhare Unconscious In Satara District Court