
कोरेगाव शहरात एका ठिकाणी बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने छापा घालून दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोरेगाव (जि. सातारा) : शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी व्हिडिओ गेम पार्लरमध्ये सुरू असलेल्या ऑनलाइन जुगारावर, तसेच शहरातीलच एका ठिकाणी बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने छापा घालून या तिन्ही प्रकरणांमध्ये मिळून सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुना मोटार स्टॅंड आणि आझाद चौकातील व्यापारी संकुलातील दुकान गाळ्यांमधील व्हिडिओ गेम पार्लरमध्ये ऑनलाइन जुगार खेळला जात असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक रितू खोखर यांना शनिवारी सायंकाळी मिळाली. पडताळणी केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांना याबाबतची माहिती देऊन दोन्ही व्हिडिओ गेम पार्लरच्या झडतीसाठी सर्च वॉरंट घेतले. त्यानंतर अधीक्षक रितू खोखर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय नाळे, हवालदार सुधीर खुडे, मिलिंद कुंभार, अमोल सपकाळ, समाधान गाढवे, किशोर भोसले, प्रमोद जाधव, नीलेश जांभळे, शुभम चव्हाण, इद्रजित भोसले, संदीप मगरे, शीतल रासकर, पूनम रजपूत यांच्या पथकाने जुना मोटार स्टॅंड परिसरातील व्हिडिओ गेम पार्लरवर छापा टाकला. तेथे परवाना नसल्याचे व ऑनलाइन जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दोन लाख 84 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात पोलिस कर्मचारी प्रमोद चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रवीणकुमार बर्गे, सुमित कदम, दीपक मोरे, आदित्य ओसवाल, सचिन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आझाद चौक येथील व्यापारी संकुलातील गाळ्यामध्ये सुरू असलेल्या व्हिडिओ गेम पार्लरवर याच पथकाने कारवाई केली. त्या ठिकाणीही परवाना नसल्याचे व ऑनलाइन जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चार लाख 19 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात हवालदार महादेव खुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल बर्गे, रवींद्र नामदास, संजय सावंत, चंद्रकांत जाधव, राजेंद्र जाधव, संजय खरात यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शहरातील महादेवनगर परिसरात आसरे रस्त्यावर बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्या एका जीपवर अधीक्षक रितू खोखर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार प्रमोद चव्हाण, प्रमोद जाधव, संतोष जाधव यांनी छापा घालून जीप व त्यामधील देशी, विदेशी दारूचे बॉक्स, असा दोन लाख 62 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात पोलिस कर्मचारी प्रमोद जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभिजित बर्गे व अरुण जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे