
दरजाई येथील संपत गुलाब सत्रे हे शेतातून घरी येत असताना डोक्यात वार करून त्यांचा खून करण्यात आला होता.
सातारा : दरजाईतील जमीन विकून पैसे देत नसल्यामुळे मुलानेच त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने वडिलांचा खून केला असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी मुलासह त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. पवन संपत सत्रे (वय 28, रा. दरजाई, ता. खटाव), सौरभ अशोक कदम (वय 23) व युवराज मोहन जाधव (वय 35, दोघे रा. वडूज, ता. खटाव) अशी त्यांची नावे आहेत.
दरजाई येथील संपत गुलाब सत्रे (वय 55) हे शेतातून घरी येत असताना डोक्यात वार करून त्यांचा खून करण्यात आला होता. पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, "एलसीबी'ची टीम, तसेच पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विश्वजित घोडके यांचे पथक या गुन्ह्याचा संयुक्त तपास करत होते. या पथकांनी खबऱ्यांचे नेटवर्क कामाला लावले. त्यातून संपत यांची कौटुंबिक माहिती जमा केली. त्यानंतर त्यांचा मुलगा पवनला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याने जमीन विकून पैसे देत नसल्यामुळे दोन मित्रांसह डोक्यात दांडके मारून वडिलांचा खून केल्याची माहिती दिली. वडील पडून जखमी झाल्याचे दर्शविण्यासाठी त्यांच्या डोक्याखाली दगड ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सौरभला ताब्यात घेतले. त्यानेही खुनाची कबुली दिली. याप्रकरणी पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
आता रामराज्य! इथं काेणच डाॅन नाही, तडीपारांना कसा धडा शिकवायचा मला चांगलं माहितीये
अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गणेश किंद्रे, निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक निरीक्षक आनंदसिंग साबळे, विश्वजित घोडके, उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे- पाटील, सहायक फौजदार तानाजी माने, हवालदार सुधीर बनकर, अर्जुन शिरतोडे, मयूर देशमुख, संकेत निकम, संजय जाधव, पुसेगावचे सहायक फौजदार आनंदराव जगताप, हवालदार चंद्रहार खाडे, सचिन खाडे, आनंदराव गमरे, पुष्कर जाधव, सचिन जगातप, सचिन माने, गणेश मुंढे, इम्तियाज मुल्ला, सुनील आबदागिरी आदी सहभागी होते.
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संपादन : बाळकृष्ण मधाळे