
गुंड दीपक मसुगडेला दोषी ठरवून पोलिस अधीक्षकांनी चार तालुक्यांतून त्याच्या तडीपारीचे आदेश दिले होते.
पुसेगाव (जि. सातारा) : पुसेगाव पोलिस ठाणे हद्दीतील कुख्यात गुंड दीपक नामदेव मसुगडे (वय 23) याला पुढील एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, कुख्यात गुंड दीपक मसुगडे (रा. रणसिंगवाडी) याच्याविरुद्ध फलटण ग्रामीण, दहिवडी व पुसेगाव पोलिस ठाण्यांमध्ये चोरी, घरफोडी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. पुसेगाव पोलिस ठाण्यात त्याच्यावर मारहाण करून जबरी चोरी केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षा झालेली होती व तो तुरुंगात होता. मसुगडेवर अनेक गुन्हे दाखल झाल्यामुळे पुसेगाव पोलिसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
सांगलीतील कैद्याचा दगडावर डोके आपटून साताऱ्यात आत्महत्येचा प्रयत्न
त्यामुळे त्याला दोषी ठरवून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चार तालुक्यांतून त्याच्या तडीपारीचे आदेश दिले होते; पण तो जेलमध्ये असल्याने तो तीन वर्षांनंतर जामिनावर सुटून येताच पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी तडीपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करून मसुगडे यास पुढील एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. या कारवाईचे सर्वच स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यात अशाच प्रकारे समाजामध्ये चोरी, घरफोडी करणे, जबरी चोरी, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कारवाई सुरू असल्याचे श्री. घोडके यांनी सांगितले.
पैसे थकीत ठेवणे पडले महागात; कऱ्हाडातील जमिनी हाेणार सरकार जमा
संपादन : बाळकृष्ण मधाळे