कॉलेज सुटल्यावर मैत्रिणीसह घरी परतणाऱ्या युवतीची छेडछाड; खटावच्या तिघांना कारावासाची शिक्षा

सलीम अत्तार
Tuesday, 2 March 2021

अजय पाटोळे याने मोटारसायकल आडवी मारून युवतीचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले होते.

पुसेगाव (जि. सातारा) : कॉलेज सुटल्यावर मैत्रिणीसह घरी परतणाऱ्या युवतीची छेडछाड करून तिने पोलिसांत तक्रार केल्यास बघून घेण्याची धमकी देणाऱ्या खटाव येथील तिघांना जिल्हा सत्र न्यायाधीशांनी तीन महिने कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 

कॉलेज सुटल्यावर मैत्रिणीसह घरी परतणाऱ्या युवतीला अजय अनिल पाटोळे (वय 20), युवराज शिवाजी पाटोळे (वय 23), तुकाराम धनाजी पाटोळे (वय 23, सर्व रा. खटाव) या आरोपींनी मोटारसायकलवरून (एमएच 11 बीडब्ल्यू 2006) येऊन खटाव येथील मराठा चौकात अश्‍लील हावभाव केले. अजय पाटोळे याने मोटारसायकल आडवी मारून युवतीचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले होते. याबाबत पोलिसांत तक्रार केल्यास बघून घेण्याची धमकीही तिला दिली होती. या घटनेचा गुन्हा 5 ऑक्‍टोबर 2018 रोजी पुसेगाव पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. पोलिस उपनिरीक्षक पी. एन. इंगळे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक केली होती. गुन्ह्यातील वाहन जप्त केले होते. या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदविल्यानंतर आरोपींविरुद्ध वडूज येथील जिल्हासत्र न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले होते. 

हे पण वाचा- हनीट्रॅप टोळीतील बारामतीच्या तिघांना अटक; प्रेमाच्या जाळ्यात ओढून साताऱ्यातील एकाला लुबाडले

या कामी सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अजित पी. कदम (साबळे) यांनी काम पाहिले. या खटल्यात तपासण्यात आलेल्या पाच साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. वाय. काळे यांनी दोषी ठरवून तिन्ही आरोपींना प्रत्येकी तीन महिने कारावास व प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अशी शिक्षा ठोठावली आहे. या कामी प्रॉसिक्‍युशेन स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नानासाहेब कारंडे, दत्तात्रय जाधव, दीपक शेडगे, सागर सजगणे, अक्षय शिंदे यांनी सहकार्य केले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Crime News Three People From Khatav Sentenced To Three Months For Molesting A Girl