esakal | खूनाचे गुढ उलगडले; महिलेच्या पती, दिरास अटक

बोलून बातमी शोधा

crime news
खूनाचे गुढ उलगडले; महिलेच्या पती, दिरास अटक
sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : मत्रेवाडी (ता. पाटण) येथील शिवारात मृतावस्थेत आढळलेल्या युवकाचा (Youth) गळा दाबून खून झाल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. अविनाश शंकर कोळेकर (वय 20) असे संबंधित युवकाचे नाव असून, एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) संबंधित महिलेच्या पती व दिराला अटक केली असून, पाटण न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत (ता. 7) पोलिस कोठडी ठोठावली. (satara crime news two arrested in patan)

याबाबत पोलिसांची माहिती अशी, कोळेकरवाडी (ता. पाटण) येथील अविनाश कोळेकर अनेक वर्षांपासून आजोळी मत्रेवाडी येथे राहण्यास आहे. कामानिमित्ताने त्याचे मुंबईत वास्तव्य असले, तरी अधूनमधून आजोळी त्याचे येणे-जाणे असते. अलीकडे काही दिवसांपासून तो मुंबईहून मत्रेवाडीस आला होता. काल सकाळी गावाजवळच्या भांगा नावाच्या शिवारात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

रात्री आलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालातून गळा दाबल्याने अविनाशचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून हा प्रकार घडल्याचे चौकशीतून समोर आल्याने संबंधित महिलेच्या पती व दिराला पोलिसांनी अटक केली. रविवारी (ता. 2) दुपारी संबंधित महिला व अविनाश शिवारात झाडाखाली गप्पा मारताना बसलेले दिसून आल्यावर संशयितांनी रागाच्या भरात त्या दोघांनाही लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून अविनाशचा गळा दाबला व त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी येथे भेट देऊन तपासकामी पोलिसांना सूचना केल्या.

पाटण न्यायालयाने संशयितांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार तपास करत आहेत. मृत अविनाशच्या मागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. कोळेकरवाडी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा: शेतक-यांची काेटयवधींची फसवणुक; जालनाच्या कंपनीवर गुन्हा