Satara : माणमधल्या अवैध धंद्यांचा करा बिमोड! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

Satara : माणमधल्या अवैध धंद्यांचा करा बिमोड!

बिजवडी : माण तालुक्यात व विशेषत: दहिवडी कार्यक्षेत्रात अवैध धंदे तेजीत आले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दहिवडी पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून काही ठिकाणी बेशिस्त वाहने, दारू, मटका या अवैध धंद्यांवर काही कारवाया केल्या. पण, या छोट्या कारवायांबरोबरच मोठ्या अवैध धंद्यांकडेही लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे. त्यामुळे दहिवडी कार्यक्षेत्रातील अवैध धंद्यांचा बिमोड करण्याचे मोठे आव्हान नूतन पोलिस अधिकाऱ्यांसमोर आहे.

माण तालुक्यात दहिवडी, म्हसवड, शिंगणापूर येथे पोलिस ठाणे आहे. दहिवडी कार्यक्षेत्रात अवैध धंद्यांत वाढ झाली आहे. पोलिस अधिकारी सुरुवातीला छोट्या कारवायांचा धडाका लावतात. मात्र, त्यानंतर छोट्या-मोठ्या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा यापूर्वीचा अनुभव आहे. तालुक्यात गावोगावी ढाबे, हॉटेलमध्ये अवैध दारूविक्री जोमाने सुरू आहे. त्यांना तालुक्याच्या ठिकाणावरूनच पुरवठा होत असतो.

पानटपऱ्या, विविध दुकानांतून अवैध पेट्रोल विक्री केली जाते. गुटखाबंदी असतानाही पानटपऱ्यांतून राजरोसपणे गुटखाविक्री होते. प्रत्येक गावात मटका, दारूविक्रीही राजरोसपणे सुरू आहे. माणमधून अवैध वाळू वाहतूकही मोठ्या प्रमाणात चालते. काही ठिकाणी जुगारांचेही मोठे अड्डे आहेत. तालुक्यात विनापरवाना अनेक दुकाने, खासगी हॉस्‍पिटल, हॉटेल्स सुरू आहेत. या सर्व अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना नसणे आश्‍चर्यकारक आहे. यावर सतत कारवाई झाल्यास अवैध धंद्यांना लगाम लागेल. मात्र, पोलिस त्याची तसदी घेताना दिसत नाहीत.

दहिवडी आठवडा बाजार व गोंदवले तीर्थक्षेत्रामुळे त्याठिकाणी वाहनांची मोठी गर्दी होत असते. ती गर्दी हाताळतानाही दहिवडी पोलिसांची दमछाक होते. सतत वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा त्रास नागरिक, छोट्या-मोठ्या दुकानदारांना सहन करावा लागतो. मलवडी येथे जुगार, मटका, दारू धंद्यांवरती छापे टाकून केलेल्या कारवाया कौतुकास्पद आहेत. मात्र, मलवडीसारख्या अनेक गावांत असे अवैध धंदे राजरोसपणे चालू आहेत, त्याचे काय करायचे. या सर्वांचे मोठे आव्हान नूतन पोलिस अधिकाऱ्यांसमोर आहे. यावर ते कसा मार्ग काढणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हप्तेखोरींमुळेच मिळतंय बळ...

गावात किती हॉटेल्स, ढाबे आहेत. किती ठिकाणी दारूविक्री, जुगार, मटका, गुटखाविक्री, पेट्रोलविक्री चालते, हे पोलिसांना माहिती आहे. मात्र, हप्तेखोरीमुळे व अवैध धंदेवाल्यांच्‍या मंथलीमुळे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे. त्यातूनच अवैध धंद्यांना बळ मिळत असून याविरोधात पोलिस कोणती भूमिका घेणार? हेही पाहावे लागेल.