धरण भरलयं; पण शेतकऱ्यांवर पाणी-पाणी करण्याची वेळ

patan
patan

ढेबेवाडी (जि. सातारा) ः दहा वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात काळगाव (ता. पाटण) विभागातील साखरी धरण पूर्ण क्षमतेने भरत असले तरी लाभक्षेत्रातील बंधाऱ्यांची कामे अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांवर उन्हाळभर पाणी-पाणी करण्याची वेळ येत आहे. धरणांतर्गत रिंगरोडसह बांधकामाशी निगडितही काही प्रश्न प्रलंबित असल्याने पाटबंधारे विभागाने तत्काळ पावले उचलून शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

काळगावनजीकच्या साखरी ओढ्यावरील धरणाच्या बांधकामाला 1996 मध्ये मंजुरी मिळाली. मध्यंतरी अनेक वर्षे बांधकाम रखडले होते. त्यानंतर हळूहळू त्याला गती मिळाली. नऊ वर्षांपूर्वी धरणाची घळभरणी होऊन प्रत्यक्ष पाणी अडविण्यासही प्रारंभ झाला. लाभक्षेत्रात पाणी अडविण्यासाठी चार बंधाऱ्यांचे नियोजन असून त्यातील एका जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती केली असली तरी उर्वरित तीन बंधाऱ्यांची कामे अपूर्णच आहेत. "धरण उशाला आणि कोरड घशाला' अशीच त्या परिसरातील गावांची अवस्था झाली आहे. दगडी अस्तरीकरण, उर्वरित सांडवा बांधकाम अशी कामेही अजून शिल्लक आहेत. 

धरणाच्या बाजूला काळगाव व परिसरातील शेतकऱ्यांची शेती असून सुमारे 50 हेक्‍टरवर पिकाऊ क्षेत्र आहे. शेतीसह दुधडेवाडीकडे जाण्यासाठी धरणाजवळून रिंगरोड तयार करण्याचे काम मध्यंतरी हाती घेण्यात आले होते. मात्र, ते अर्ध्यात रखडल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. बाजूने संरक्षक भिंत बांधून या रस्त्याला कायमस्वरूपी सुरक्षितता देण्याची शेतकरी व नागरिकांची मागणी आहे. मात्र, त्याऐवजी रस्त्याच्या बाजूने क्रॅश बॅरिअर लावले आहेत. ठिकठिकाणी फरशी पूल नसल्याने पावसाचा जोर वाढल्यावर शिवारात गेलेले शेतकरी तिकडेच अडकून पडल्याचे प्रसंग पावसाळ्यात घडतात. धरणाची पाणी साठवण क्षमता 75 दशलक्ष घनफूट असून 316 हेक्‍टर क्षेत्र लाभक्षेत्रात समाविष्ट आहे. काही वर्षांपासून तांत्रिक अडचणीत अडकलेल्या या धरणाची आता अडचणीतून सुटका झालेली आहे. कार्यकारी अभियंता सुरेन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक कार्यकारी अभियंता उत्तमराव दाभाडे व त्यांचे सहकारी प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी परिश्रम घेत असले तरी लॉकडाउनमुळे यंदा प्रलंबित कामे रखडल्याचे दिसून येत आहे. 


तब्बल 25 वर्षे उलटली तरी शेतीला पाणी मिळण्याची चिन्हे नाहीत. बंधारेच नसल्याने पाणी कशात अडविणार? रिंगरोडचं घोंगडंपण अजून भिजतच पडलंय. 

- सूर्यकांत ऊर्फ राजू काळे, शेतकरी, काळगाव 

(संपादन ः संजय साळुंखे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com