
Satara : मोदी-अदानी युतीमुळे लोकशाही धोक्यात ; पृथ्वीराज साठे
सातारा : कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अधिवेशनात अदानींविषयी विचारलेल्या प्रश्नांची मिरची मोदी सरकारला लागली असून, यातूनच त्यांची खासदारकी गुजरात खटल्याचे निमित्त करून रद्द केली आहे. हा राजकीय कटाचाच एक भाग आहे. मोदी अदानी युतीमुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे, अशी टीका अखिल भारतीय कॉँग्रेस समितीचे सचिव पृथ्वीराज साठे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
श्री. साठे म्हणाले, ‘‘देशाच्या राजकीय पटलावर अनेक घटना घडल्या असून, त्यानुसार काँग्रेसने मोदी अदानी या युतीची माहिती लोकांना देण्याचे काम हाती घेतले आहे. खासदार राहुल गांधी यांना अचानकपणे दोन वर्षे शिक्षा सुनावून त्यांची खासदारकी रद्द केली. दिल्लीच्या शासकीय निवासस्थानातून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे.
सात फेब्रुवारीला मोदी अदानी संबंधांचे मुद्दे संसदेत उपस्थित केले. राहुल यांनी असे काय मुद्दे उपस्थित केले, ज्याची मिरची मोदी सरकारला लागली. सत्ताधारी पक्षाचे खासदार अधिवेशन चालू देत नाही, हे अनाकलनीय आहे. अदानींच्या बंधूंच्या सेल कंपनीतील २० हजार कोटींची गुंतवणूक कोणाची? हा प्रश्न अनुत्तरित आहे.’’
संरक्षण विभागाची कंत्राटे चिनी कंपन्यांना देऊन देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जात आहे, असा आरोप श्री. साठे यांनी केला. पंतप्रधान मोदी देशासाठी जातात, की अदानीच्या कंपनीचे ब्रॅण्डिंग करायला, असा टोला त्यांनी लगावला. एलआयसी कंपनी सुद्धा अदानी समूहाच्या माध्यमातून अडचणीत आणण्याचे काम मोदींनी केले. राहुल गांधी यांची खासदारकी का रद्द केली? याचे स्पष्ट उत्तर अद्याप मिळालेले नाही.
मोदी अदानी युतीमुळे देशातील लोकशाही धोक्यात आली असून, देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे निघाल्याचे श्री. साठे यांनी सांगितले. अदानी मोदींचा कारभार थांबवून देश वाचविला पाहिजे. त्यासाठी ही जनजागृती सुरू असल्याचे श्री. साठे यांनी सांगितले. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, उदयसिंह उंडाळकर, रणजितसिंह देशमुख, राजेंद्र शेलार, नरेश देसाई, रजनी पवार, अजित पाटील चिखलीकर, धनश्री महाडिक, मालन परळकर, रजिया शेख, अरबाज शेख आदी उपस्थित होते.