सर्वाधिक पावसामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प युनिक

Satara
Satara

कऱ्हाड (जि. सातारा) : कोयना व चांदोलीच्या कार्यक्षेत्रात साकारलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प घनदाट जंगल, जैवविविधता, पाण्याच्या मुबलकतेमुळे विशेष ठरतो आहेच. मात्र, पावसाचे मुबलक प्रमाण असलेली ठिकाणेही सह्याद्री व्याघ्रमध्ये येत आहेत. त्यामुळे तो प्रकल्प राज्यात युनिक ठरला आहे. सर्वाधिक पावसाची पाथरपुंज, वलवण, नवजा व महाबळेश्वर आदी ठिकाणे प्रकल्पात आहेत. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वेगळेपण अधिक ठळकपणे पुढे येत आहे. 

कोयनेचे जंगल उत्तर-दक्षिण दिशेला 100 किलोमीटर कोकण कड्याला समांतर आहे. कोकणातून वर येणारे पावसाचे ढग दाट जंगलामुळे कोयनेत स्थिरावतात. तेथे जोराचा पाऊस बरसतो. तेथे जंगलामुळे जमिनीची धूप होत नाही. त्यामुळे गाळविरहित पावसाचे पाणी धरणाला मिळते. गाळ येण्याचे प्रमाण कमी असल्याने धरणाची क्षमता वाढते आहे. महाबळेश्वरचा पाऊस कोयना व कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात विभागतो. जांभळी खोऱ्यातून पाणी धोम धरणाला मिळते.

जावळी, प्रतापगड परिसरातील खोऱ्याचे पाणी कोयना नदीला मिळते. प्रतापगडाच्या दक्षिणेला तापोळा येथे सोळशी खोऱ्यातून वाहणारे पाणी कोयनेला मिळते. बामणोलीनजीक कांदाटी खोऱ्यातील कांदाट नदीचे पाणी कोयनेला मिळते. पुढे मालदेव, पाली, जुंगटी, शिरशिंगे, नवजा खोऱ्यातील पाणी कोयनेला मिळते. त्यामुळे त्या भागात समृद्ध जंगले व जैवविविधता आहेत. तेथील गावांचे पुनर्वसन झाल्यामुळे तो परिसर मानवी वस्तीविरहित आहे. त्यामुळे अधिक दाट जंगले झाली आहेत.

कांदाटी खोऱ्यात वलवण, नवजा खोऱ्यात नवजा येथे पर्जन्यमान मोजणारी यंत्रणा आहे. वारणा नदीचे उगमस्थान असणारे पाथरपुंज कोयना धरणापासून दहा किलोमीटर हवाई अंतरावर आहे. त्यामुळे नवजा, वलवणचा पाऊस पाथरपुंजला जवळपासच आहे. ओझर्डे धबधब्याचे पाणी घाटमाथ्यावर तोरणा पठारापासून धबधब्यापर्यंत सुमारे सात ते आठ किलोमीटर प्रवास करून येते. तब्बल तेथील आठ टीएमसी पाणी कोयना धरणाला मिळते. त्यामुळे पाथरपुंज, नवजा, महाबळेश्वर व वलवण ही चारही सर्वाधिक पावसाची स्थळे आहेत. ती सगळीच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आहेत. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र अतिपावसाचा प्रकल्प म्हणून ओळखला जावू लागल्याने तो राज्यात अव्वल ठरला आहे. 

...असा झाला पाऊस (मिलिमीटरमध्ये) 

-पाथरपुंज : पाच हजार 784 
-वलवण : पाच हजार 104 
-नवजा : चार हजार 774 
-महाबळेश्वर : चार हजार 707 

संपादन : पांडुरंग बर्गे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com