'या' मुळे पर्यटकांची ठोसेघर धबधब्याकडे पाठ; सारेकाही सुने सुने...

सुनील शेडगे
रविवार, 28 जून 2020

ठोसेघरचा धबधबा पाहून बहुतेक पर्यटक चाळकेवाडी गावालगतच्या पवनचक्कीच्या पठारास भेट देत असतात. यंदा हा परिसरही पर्यटकांच्या गर्दीविना शांत दिसत आहे. परिसरात सध्या ढगाळ हवामान आहे. अधूनमधून पावसाच्या हलक्‍या सरीही कोसळताना दिसतात.
 

सातारा : राज्यातील पर्यटकांचे आकर्षणस्थान असलेल्या ठोसेघरच्या धबधब्याचा परिसर पर्यटकांअभावी सुना सुना बनला आहे. धबधब्याकडे जाणारे मुख्य प्रवेशद्वार परवानगीअभावी बंद असल्यामुळे पर्यटकांनी या निसर्गस्थळाकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र प्रत्ययास येत आहे.
 
ठोसेघरचा धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी. केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातील विविध ठिकाणच्या पर्यटकांना या धबधब्याने भुरळ घातली आहे. अत्यंत उंचावरून पडणाऱ्या या जलप्रपाताचे दृश्‍य विलक्षण विलोभनीय ठरते. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात या निसर्गस्थळास हजारो पर्यटक भेटी देतात.

पावसाळ्याच्या दिवसांत पर्यटकांच्या गर्दीने हा परिसर सदैव गजबलेला असतो. जूनच्या आरंभीपासूनच या परिसराकडे पर्यटकांची पावले वळू लागतात. यंदाचे वर्ष मात्र या स्थितीला अपवाद ठरले आहे. गेल्या आठवड्यात परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. आधीच विपुल वृक्षराजीने नटलेला हा प्रदेश आणखी हिरवागार बनला आहे. मात्र, कोरोनाजन्य परिस्थितीमुळे धबधबा परिसरात पर्यटकांची वानवा आहे. धबधब्याकडे जाणारे मुख्य प्रवेशद्वार सध्या बंद स्थितीत आहे. त्यामुळे जून महिना उजाडूनदेखील परिसरात शुकशुकाट जाणवत आहे. एरवी या काळात येथील मुख्य मार्गावर पर्यटकांच्या वाहनांच्या लांबवर रांगा लागलेल्या दिसतात. यंदा मात्र जिल्ह्यातील हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ बंद असल्यामुळे पर्यटकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात कास परिसरात पोलिसांनी पर्यटकांवर कारवाई केली होती. त्यामुळे ठोसेघरला जाण्याचा बेत आखलेल्या पर्यटकांच्या उत्साहावर आपोआपच विरजण पडले आहे. 

पवनचक्‍क्‍यांचे पठारही स्तब्ध 

ठोसेघरचा धबधबा पाहून बहुतेक पर्यटक चाळकेवाडी गावालगतच्या पवनचक्कीच्या पठारास भेट देत असतात. यंदा हा परिसरही पर्यटकांच्या गर्दीविना शांत दिसत आहे. परिसरात सध्या ढगाळ हवामान आहे. अधूनमधून पावसाच्या हलक्‍या सरीही कोसळताना दिसतात.

महाबळेश्‍वर : शेतकरी, व्यापारी, लघू व मोठ्या कारखानदारांसाठी महत्वाची बातमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Due To Lockdown Tourist Are Not Visiting Thoseghar Waterfall