वीजबिल वसुली चांगली; तर दुरुस्तीस प्राधान्य | satara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीजबिल

सातारा : वीजबिल वसुली चांगली; तर दुरुस्तीस प्राधान्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : रब्बीचा हंगाम सुरू असून, शेतीपंपांच्या वीज मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यासोबतच विजेच्या तक्रारीही वाढल्या आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘महावितरण’ने पुन्हा एकदा ''एक गाव, एक दिवस'' हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या गावांत वीजबिल वसुलीचे प्रमाण चांगले आहे, अशाच गावांत हा उपक्रम प्राधान्याने राबवून तेथील सर्व वीज समस्या दूर करण्याचा प्रयत्न ‘महावितरण’चे अधिकारी व कर्मचारी करत आहेत. आतापर्यंत सातारा मंडलातील २१८ गावांत हा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे.

बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून ''एक गाव, एक दिवस'' हा उपक्रम वीज समस्यांवर रामबाण उपाय ठरला आहे. त्यामुळे हा उपक्रम आता ‘महावितरण’तर्फे संपूर्ण राज्यात राबविला जात आहे. या उपक्रमासाठी गावाची निवड करताना सर्वप्रथम त्या गावातून होणाऱ्या वसुलीचा विचार केला जात आहे.

हेही वाचा: सोलापूर : महापालिकेवर २९३ कोटींचा बोजा

त्यापाठोपाठ इतर निकष लावून गावात ‘महावितरण’ची संपूर्ण यंत्रणा एकाच दिवशी जाते. जाताना पुरेशे मनुष्यबळ, साधनसामुग्री सोबत असते. यामध्ये विजेचे खांब, तारा, स्टे, किटकॅट, रोहित्राचे ऑईल इत्यादींचा समावेश आहे. तर वीजबिलाच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी लेखा विभागाचे कर्मचारीही सोबत असतात. एकूणच गावातील नागरिकांच्या विजेबाबतच्या सर्व समस्या निवारण्याचे काम या उपक्रमात केले जाते.

त्याचा फायदा पुढे वसुलीला होतो. गावातील झुकलेले, मोडलेले खांब उभे करणे, तारांना ताण देणे, जास्त झोळ असल्याने मधोमध नवीन खांब उभा करणे, स्पेसर लावणे, रोहित्राची व वितरणपेटीची देखभाल, दुरुस्तीची कामे करणे, अनधिकृत भार काढून त्यांच्यावर कारवाई करणे तसेच नवीन कनेक्शन घेण्यास प्रवृत्त करणे आदी कामे केली जातात. तर वीजबिलातील त्रुटी, नावात बदल या तक्रारींचेही जागेवर निराकरण करण्याचे काम या उपक्रमातून होत असल्याने अनेक गावांतून या उपक्रमासाठी आग्रह धरला जातो. आतापर्यंत बारामती मंडलात १७९, सोलापूर २४० तर सातारा मंडलातील २१८ गावांत हा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे.

हेही वाचा: मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसची जनजागरण मोहीम

वीजबिल भरण्यासाठी केंद्रासोबत ऑनलाइन पर्याय

ग्राहकांनीही वापरलेल्या विजेचे वीजबिल वेळेत भरणे त्यांचे कर्तव्यच आहे. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी ‘महावितरण’ने अधिकृत वीजबिल भरणा केंद्रासोबतच अनेक ऑनलाइन पर्याय दिले आहे. नवीन नियमांनुसार एक नोव्हेंबरपासून एका महिन्यात पाच हजारांहून अधिकचे वीजबिल रोखीने स्वीकारता येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी महावितरण मोबाईल ॲप, www.mahadiscom.in हे संकेतस्थळ, गुगल पे, फोन पे आदी युपीआय ॲपचा वापर करून दरमहाचे वीजबिल भरावे.

loading image
go to top