कऱ्हाड : केबल चॅनेलद्वारे ज्ञानदान, पालिका शाळा क्रमांक तीनच्या प्रयत्नास यश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी शाळा बंदच्या काळात विद्यार्थ्यांना सुलभ पद्धतीने अभ्यास करता यावा, यासाठी शहरासह तालुक्‍यातील केबलवर प्रक्षेपित होणारे स्थानिक चॅनेल दोन महिन्यांसाठी घेतले आहेत. 

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी शाळा मात्र बंद आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने ऑनलाइन अभ्यास सुरू करण्याचे निर्देश दिल्यानुसार शाळा मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत आहेत. टीव्हीद्वारे अभ्यास घेण्याचे शासनाचे नियोजन सुरू आहे. मात्र, त्यापूर्वीच येथील पालिकेच्या शाळा क्रमांक तीनने पुढाकार घेत स्थानिक केबल चॅनेलद्वारे तसेच शाळेचे यू ट्यूब चॅनेल तयार करून शिक्षण देण्यास सुरवात केली आहे. मोबाईलपेक्षाही स्थानिक केबल चॅनेलद्वारे दिल्या जाणाऱ्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण आहे. 

राज्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेली व पालिकांमधील पहिली आयएसओ मानांकन प्राप्त शाळा म्हणून या शाळेचा लौकिक आहे. सातत्याने नवनवीन उपक्रमांमुळे शाळा नेहमीच प्रकाशझोतात असते. त्यासाठी मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी शाळा बंदच्या काळात विद्यार्थ्यांना सुलभ पद्धतीने अभ्यास करता यावा, यासाठी शहरासह तालुक्‍यातील केबलवर प्रक्षेपित होणारे स्थानिक चॅनेल दोन महिन्यांसाठी घेतले आहेत. त्याद्वारे दररोज सकाळी साडेदहा ते साडेबारापर्यंत या वेळेत शाळेतील शिक्षकांचे पाठ दाखवले जात आहेत. शिवाय सकाळच्या सत्रात ज्या विद्यार्थ्यांना ते पाहता येणे शक्‍य होत नाही, त्यांच्यासाठी सकाळी झालेल्या पाठाचे पुनर्प्रक्षेपण सायंकाळी दाखवले जाते. पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी हे स्थानिक केबल चॅनेल आहे. त्यासाठी शाळेत स्टुडिओ बनवला असून, तेथे शिक्षक दोन तास शिकवतात. त्याचे चित्रीकरण केले जाते. दुसऱ्या दिवशी ते चॅनेलवर वेळापत्रकानुसार प्रक्षेपित केले जाते. दरम्यान, प्रत्येक अर्ध्या तासाला वर्गनिहाय व विषयानुसार हे पाठाचे वेळापत्रक तयारी केल्याचे सांगण्यात आले. 

सर्व विद्यार्थ्यांपर्यत हा अभ्यास पोचतो का? यासाठी विद्यार्थ्यांकडे चॅनेल दिसते का? याचा सर्व्हे केला. त्यात 70 टक्के पालकांकडे हे चॅनेल दिसत असल्याचे समोर आले. तर यापूर्वीच केलेल्या सर्व्हेत 95 टक्के पालकांकडे स्मार्ट मोबाईल असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना टीव्ही चॅनेल उपलब्ध होत नाही, त्यांच्यासाठी शाळेने यू ट्यूबवर पाठाचे व्हिडिओ अपलोड करण्याची व्यवस्था केली आहे. त्याद्वारेही विद्यार्थ्यांना अभ्यास करता येऊ शकतो. दरम्यान, स्थानिक चॅनेलमुळे केवळ पालिकेच्या शाळांतीलच नव्हे तर तालुक्‍यात प्रक्षेपित होणाऱ्या भागातील सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. 
दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार शाळेने पहिली, दुसरीतील विद्यार्थ्यांसाठी गाणी, गोष्टींचे शिक्षकांचे व्हिडिओ व्हॉटसऍप ग्रुपवर टाकले आहेत. तिसरी, चौथीचे शिक्षक फेसबुक, व्हॉटसऍप, झूप आदीद्वारे विद्यार्थ्यांशी थेट बोलून अभ्यास घेतात. त्याद्वारे शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद होतो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासंदर्भात मुख्याध्यापक श्री. कोळी फेसबुक लाइव्हद्वारे पालकांशी संवाद साधत आहेत. 

शाळा सज्ज... 

कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. मात्र, शासनाने एक दिवसाआड शाळा घेण्याचे नियोजन केले तरी पालिका शाळा क्रमांक तीनने पूर्ण तयारी केली आहे. शाळेतील प्रत्येक वर्गासमोर अशी 40 सॅनिटायझर मशिन बसवली आहेत. शाळेतर्फे विद्यार्थ्यांना मास्क, हॅंडग्लोज देण्याची तयारी असल्याचे मुख्याध्यापक श्री. कोळी यांनी सांगितले. 

""विद्यार्थ्यांना घरबसल्या व्यवस्थित शिक्षण घेता यावे, यासाठी स्थानिक टीव्ही चॅनेलद्वारे शिक्षण दिले जात आहे. त्यास विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ पालिकाच नव्हे तर तालुक्‍यातील अन्य शाळांतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे.'' 

- अर्जुन कोळी, 
मुख्याध्यापक, 
पालिका शाळा क्रमांक तीन, कऱ्हाड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Enlightenment Through Cable Channel In Karad, Success Of Municipal School No. 3