Satara: शेतकऱ्यांच्या सूचना विचारात घेऊन महामार्गाचं काम करा : पालकमंत्री पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांच्या सूचना विचारात घेऊन महामार्गाचं काम करा

शेतकऱ्यांच्या सूचना विचारात घेऊन महामार्गाचं काम करा : पालकमंत्री पाटील

सातारा : सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ४८ (जुना क्र.४) चे सहा पदरीकरणाचे काम स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करा. तसेच, महामार्गाचे काम गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत रस्ता रुंदीकरण (सहा पदरीकरण) डीपीआरबाबत पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, महामार्गाचे प्रकल्प संचालक वसंत पंधरकर, चंद्रकांत भरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: ऊस आंदोलन पोलिस गोळीबार; नवव्या स्मृतिदिनी आठवण

श्री. पाटील म्हणाले,‘‘पावसाळ्यात पुराचे पाणी महामार्गावर येत असल्याने वाहतूक खोळंबते. त्यामुळे, संबंधित ठिकाणी पाहणी करुन त्या ठिकाणी रस्त्यांची उंची वाढवावी. ज्या ठिकाणी नवीन पुल करण्यात येणार आहेत त्या पुलांवरील बाजुचे कठडे मजबुत करा. महामार्गाच्या बाजुला तयार करण्यात येणारा सर्व्हिस रोडचे काम उत्तम करावे. तसेच, सर्व्हिस रोडवर कुठेही पाणी साठणार नाही याची दक्षता घ्या.

महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्गावर कुठेही पिकप शेड करु नये, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केल्या. स्थानिक नागरिक व शेतकरी यांच्या अडचणी लक्षात घेऊन तयार करण्यात येणाऱ्या महामार्गावरील पुलांची कामे करण्याच्या सूचना श्री. कबुले यांनी केल्या. या बैठकीत महामार्गाचे प्रकल्प संचालक वसंत पंधरकर यांनी महामार्गाच्या कामाचे सविस्तर सादरीकरण केले. तसेच, मान्यवरांनी केलेल्या सूचनांचा विचार करुनच महामार्गाचे काम करण्याचे आश्‍वासन श्री. पंधरकर यांनी दिले.

loading image
go to top