सातारा : शेतकरी संघटनेमुळे शेतकऱ्यांना मिळाला न्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा : शेतकरी संघटनेमुळे शेतकऱ्यांना मिळाला न्याय

सातारा : शेतकरी संघटनेमुळे शेतकऱ्यांना मिळाला न्याय

सातारा (बिजवडी) : दहिवडी वीज वितरण कंपनीच्या विस्कळित कारभारामुळे येळेवाडी (ता. माण) येथे गेल्या २० ते २५ दिवसांपासून ट्रान्सफाॅर्मर खराब झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झालेला होता. याप्रश्‍नी शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेकडे धाव घेतली होती. त्यानंतर संघटनेच्या केशव जाधव यांनी शेतकऱ्यांसह थेट दहिवडी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. याची दखल घेत ‘वीज वितरण’ने तत्काळ ट्रान्सफाॅर्मर बसविल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.

वीजवितरण कंपनीच्या विस्कळित कारभारामुळे येळेवाडी हद्दीतील जगतापवस्तीनजीकच्या ट्रान्सफाॅर्मरवरील वीजपुरवठा अनेक दिवस खंडित झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे मोठे नुकसान होत होते. याबाबत वीज वितरण कंपनीशी वारंवार संपर्क करूनही शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत होत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपला प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती.

त्या वेळी शेतकरी संघटनेच्या सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष केशव जाधव, माण तालुका संघटक रामचंद्र बळीप, शेतकरी संघटनेचे माण तालुकाध्यक्ष शंकरराव जाधव, दहिवडी शहराध्यक्ष ज्योतिराम जाधव, पिंटू जगताप, येळेवाडी गावातील शेतकरी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढत तत्काळ ट्रान्सफाॅर्मर बसवण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत वीजवितरण कंपनीने ट्रान्सफाॅर्मर बसविल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत शेतकरी संघटनेचे आभार मानले.

टॅग्स :SataraFarmerJustice