अन्यायकारक विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी आंदोलन; पाटणकरांचा मोदी सरकारला इशारा

ऋषिकेश पवार
Saturday, 9 January 2021

कृषी विधेयक मागे घेतलेच पाहिजे, ते मागे घेतले तरी शेतकऱ्यांचे शोषण संपणार नाही. त्यासाठी महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या भूमिकेला पाया मानून पर्यायी कृषी धोरण स्वीकारले पाहिजे, असे मत डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले.

विसापूर (जि. सातारा) : केंद्राचे अन्यायी कृषी विधेयक मागे घेऊन महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेच्या तत्त्वावर नवे कृषी धोरण अवलंबले पाहिजे, यासाठी श्रमिक मुक्ती दलाने महात्मा फुले यांच्या मूळ गावी कटगुण येथे आज ठिय्या आंदोलन केले. 

या वेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई, डी. के. बोडके, ऍड. शरद जांभळे, सुधीर नलवडे, दिलीप पाटील, व्यंकटराव पन्हाळकर, ऍड. धम्मसागर भारती यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथील प्रमुख कार्यकर्ते प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.

एकीमुळेच महाविकास आघाडीचा विजय; माजी मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

दरम्यान, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी व्हिडीओ कॉलद्वारे आंदोलकांशी संवाद साधला. ते म्हणाले, "कृषी विधेयक मागे घेतलेच पाहिजे, ते मागे घेतले तरी शेतकऱ्यांचे शोषण संपणार नाही. त्यासाठी महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या भूमिकेला पाया मानून पर्यायी कृषी धोरण स्वीकारले पाहिजे. त्याची सुरवात या आंदोलनाने झाली आहे. ही भूमिका घेऊन हे आंदोलन देशव्यापी करण्यासाठी श्रमिक मुक्ती दल पुढाकार घेईल.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Farmers Protest News Shramik Mukti Dal Agitation At Katgun