सातारा : तीन तालुक्यांत पहिला डोस पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccine

सातारा : तीन तालुक्यांत पहिला डोस पूर्ण

सातारा : जिल्ह्यात लसीकरण मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पहिला डोस सुमारे २० लाख, तर दुसरा डोस नऊ लाख ४६ हजार नागरिकांचा पूर्ण झाला आहे. दरम्यान, सद्यःस्थितीत लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून, जिल्ह्यात सातारा, खंडाळा व महाबळेश्‍वर या तालुक्यांत लसीकरणाचा पहिला डोस १०० टक्के पूर्ण झाला आहे.

जिल्ह्यात एक जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली. सुरुवातीच्या टप्प्यात जिल्ह्याला लशींचे डोस जादा आल्याने लसीकरण मोहीम वेगाने सुरू होती. मात्र, एप्रिल ते जून महिन्यापर्यंत लसीकरण मोहीम लशींअभावी मंदावल्याचे दिसून आले. मात्र, जुलै महिन्यानंतर जिल्ह्यात लसीकरणाची संख्या वाढल्याचे दिसून आले. लशींची संख्या जादा उपलब्ध झाल्याने एकाच दिवसात तब्बल ६० हजार लसीकरण झाल्याचीही नोंद आढळून आली आहे. त्याचबरोबर, लसीकरण सत्रांचीही संख्या वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यांचे १०० टक्के लसीकरण वगळून उर्वरित आठ तालुक्यांत पहिला डोस ८० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी घेतला आहे.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

दरम्यान, जिल्ह्याची १८ वर्षांपुढील एकूण लोकसंख्या २० लाख ८० हजार ३३७ आहे. त्यामध्ये पहिला डोस २० लाख पाच हजार नागरिकांनी घेतला असून, ९ लाख ४६ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाच्या आकडेवारीत सातारा जिल्ह्याचा तीन तालुक्यांत पहिला डोस पूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात दुसरा क्रमांक असून, राज्यभरात महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो. जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा केल्याने लशींचे डोसही जादा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांत आरोग्य विभागाने लसीकरणाची संख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले होते. त्यामध्ये महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिर, आरोग्य केंद्रामध्ये सलग ७५ तास लसीकरण सुरू, कवचकुंडल मोहीम, शहरी भागात प्रभागनिहाय लसीकरण यासारखे विविध उपक्रम राबविल्याने नागरिकांमध्ये जनजागृती होत लसीकरण करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे लसीकरण मोहीम अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र दिसते.

"राज्यभरातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात वेगाने लसीकरण सुरू आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात लशींचे जादा डोस उपलब्ध असल्याने उर्वरित नागरिकांनी लसीकरण करण्याची आवश्‍यकता आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात १०० टक्के लसीकरणाचा प्रयत्न सुरू आहे."

- डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा

loading image
go to top